मुंबई : कोरोना व्हायरसमुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात हिंदी कलाविश्वातील बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींनी जगाचा निरोप घेतला. अनेकांच्या निधनानं चाहते आणि सेलिब्रिटी वर्तुळातून हळहळही व्यक्त करण्यात आली. यातच आता आणखी एक सुप्रसिद्ध चेहरा काळच्या पडद्याआड गेला आहे. त्यामुळं बॉलिवूडचं आणखी एक रत्न काळानं हिरावून घेतलं अशा शब्दांत सध्या दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बी- टाऊनमध्ये साहस दृश्यांच्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या परवेज खान या ऍक्शन डिरेक्टरचं वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झालं आहे. सोमवारी, म्हणजेच २७ जुलै २०२० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाच्या एक दिवस आधी रात्रीच्या वेळी त्यांच्या छातीत अचानक वेदना जाणवू लागल्या. ज्यानंतर सकाळी तातडीनं त्यांना रुग्णालयात नेण्यात आली. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. 


चित्रपट निर्माते- दिग्दर्शक हंसल मेहता यांनी परवेज यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. 'आताच कळलं की ऍक्शन डिरेक्टर परवेज खान आपल्यात नाहीत. आम्ही शाहीद या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. जिथं त्यांनी दंगलीची दृश्य एका टेकमध्ये करवून घेतली होती. अतिशय कलागुणसंपन्न, उत्साही आणि चांगल्या वृत्तीचा माणूस. तुमच्या आत्म्याला शांती लाभो परवेज. तुमचा आवाज आजही माझ्या कानात घुमत आहे', असं ट्विट मेहता यांनी केलं. 




'अंधाधुन', 'बदलापूर', 'बुलेट राजा', 'फुकरे', 'रा वन', 'विश्वरुपम', 'विश्वरुपम 2', 'देव डी', 'गँगस्टर', 'अब तक छप्पन', 'द लेजेंड ऑफ भगत सिंग', 'सोल्जर', 'मिस्टर ऍन्ड मिसेस खिलाडी' यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं होतं. परवेज यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असं कुटुंब आहे.