अमृता सुभाषबद्दल केलेल्या `त्या` विधानावर अनुराग कश्यपने दिलं स्पष्टीकरण, `मी तिचं उदाहरण देत...`
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) अभिनेत्री अमृता सुभाषच्या (Amruta Subhash) एजंटकडून झालेल्या मागण्यांची माहिती दिल्यानंर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यानंतर अनुराग कश्यपने आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) नुकतंच 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीतील चुकींच्या पद्धतींवर बोट ठेवत कठोर पद्धतीने टीका केली होती. यावेळी त्याने अभिनेत्यांकडून होणाऱ्या मागण्यांचा दाखला देत एजन्सी आणि एजंट्सना जबाबदार धरलं होतं. यावेळी त्याने अमृता सुभाषचा उल्लेख करत एक किस्सा सांगितला होता. मात्र अनुराग कश्यपने हा किस्सा सांगितल्यानंतर अमृता सुभाषला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यानंतर अनुराग कश्यपने स्पष्टीकरण दिलं असून, इंस्टाग्राम स्टोरीत पोस्ट शेअर केली आहे.
अमृता सुभाषची पाठराखण
अनुराग कश्यपने इंस्टाग्रामला स्टोरी शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, "माझ्या मुलाखतीनंतर अनेकजण माझी मैत्रीण अमृता सुभाषला टार्गेट करत आहेत. ही पोस्ट मी हे सांगण्यासाठी करत आहे की, आमच्यात इतकं प्रेम आणि विश्वास आहे की मी ते करु शकतो. ज्या चित्रपटाबद्दल विचारणा होत आहे तो चोक्ड असून, तिने तो अत्यंत सुंदरपणे पूर्ण केला. येथे एनज्सी खरे आरोपी आहेत, ज्यांनी तिच्या वतीने मागण्या केल्या. मी अमृताला फोन केला असता तिला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तिने यानंतर तात्काळ ती एनज्सी सोडली".
अमृता सुभाषने ही स्टोरी रिपोस्ट केली आहे. "अनुराग तुझ्या या कृतीमुळे मी भारावले आहेत. मी माझे मित्र फार काळजीपूर्वक निवडते. तुझ्यासारखी व्यक्ती माझा मित्र आहे हे माझं भाग्य आहे", असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
अनुराग कश्यपने काय सांगितलं होतं?
"मी एक चित्रपट करत होतो, त्यात अमृता सुभाष होती. मी अमृता सुभाषसोबत तीन वेळा काम केलं आहे. त्यामुळे ती किती साधी आहे याची मला माहिती आहे. मला एक दिवस तिच्या मॅनेजरकडून काही मागण्या आल्या. त्यामध्ये सिंगल डोअर व्हॅनिट व्हॅन यासह इतर मागण्या करण्यात आल्या होत्या. मी ते पाहिल्यानंतर वेड लागलंय का असंच म्हटलं होतं. मी सरळ मॅनेजरला फोन केला आणि अमृता सुभाषला चित्रपटातून काढत असल्याचं सांगितलं. यानंतर मी फोन सरळ ठेवून दिला," असं अनुराग कश्यपने सांगितलं.
पुढे त्याने सांगितलं की, "त्यानंतर मला अमृता सुभाषचा फोन आला. माझी काय चूक झाली असं ती विचारत होती. कारण तिला तिच्या एजंटने काय मागितलं आहे याची माहितीच नवह्ती. यानंतर तिने मॅनेजरला चांगलंच सुनावलं. माझ्या नावे तू अशा गोष्टी कशा काय मागू शकतोस अशी विचारणा तिने केली". अनुराग कश्यपने अशा गोष्टी अनेकदा झाल्याचंही सांगितलं.
अनुराग कश्यप आणि अमृता यांनी रमन राघव 2.0, चोक्ड- पैसा बोलता है या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. याशिवाय Sacred Games च्या सीझन 2 मध्येही एकत्र होते.