मलायकासोबतच्या नात्याविषयी अर्जुनच्या बहिणीची `ही` भूमिका
सध्या अर्जुन कपूर आणि मलायकाच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरत आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर सध्या समाजकार्यामध्ये व्यस्त आहे. 'फॅनकाइन्ड' या उपक्रमाच्या माध्यमातून ती गरजूंसाठी निधी जमा करण्याचं काम करणार आहे. हा नवीन उपक्रम चाहत्यांना सेलेब्ससोबत जोडणार आहे. याच प्रशंसनीय कामामुळे अभिनेता अर्जुन कपूर प्रमाणेच त्याची बहीण अंशुलाही प्रकाशझोतात आहे. अंशुला माध्यमांपासून तुलनेने दूरच राहते. पण, ती कायमच तिची मतंही तितक्याच ठामपणे मांडते. नुकतंच एका मुलाखतीत तिला अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
'मिड डे'ने घेतलेल्या या मुलाखतीत भावाच्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली की, 'अर्जुन माझ्या पेक्षा ६ वर्ष मोठा आहे. आम्ही एकमेकांच्या खासगी आयुष्याबद्दल कधीच संवाद साधत नाही. खासगी आयुष्यावर बोलताना आम्हाला फार अवघडल्यासारख वाटतं. अर्जुन एका भावापेक्षा जास्त आईप्रमाणे माझी काळजी करतो. तर कधी मी देखील त्याची आईप्रमाणे काळजी घेते.' अर्जुन आणि मलायकाच्या नात्याविषयी सर्व कलाविश्वात चर्चा सुरु असते. पण, या वक्तव्यावरुन अंशुला मात्र या साऱ्यापासून दूर असते हेच स्पष्ट होत आहे.
सध्या अर्जुन कपूर आणि मलायकाच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरत आहेत. त्याचप्रमाणे दोघांनी त्यांच्या नात्याची आधिकृत घोषणा देखील केली आहे. दोघांमध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे त्यांच्या नात्यावर नेटकऱ्यांनी चांगलीच टीकेची झोड उठवली होती.