VIDEO : मुलीची एक झलक टीपण्यासाठी बिग बींचे हे प्रयत्न पाहिले?
हे सारं वडीलच मुलीसाठी करु शकतात
मुंबई : वडील आणि मुलीचं नातं हे खऱ्या अर्थाने शब्दांत व्यक्त न करता येणारं असतं. दर दिवसागणिक मुलगी मोठी होत असते. पण, तिच्या वडिलांच्या नजरेत मात्र ती कायमच लहान असते. त्यामुळे आपल्या मुलीची प्रत्येक कृती, तिचा प्रत्येक निर्णय आणि तिला मिळणारी दाद हे सारंकाही वडिलांसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. बिग बी अमिताभ बच्चनही अभिमानी वडिलांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांचा एक व्हायरल होणारा व्हिडिओ पाहता हे लगेचच लक्षात येत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन, श्वेताची एक झलक टीपण्यासाठी बिग बी असे काही प्रयत्न करताना दिसत आहेत जे पाहता अनेकांना त्यांच्या वडिलांची आठवण येऊ शकते. श्वेत रॅम्पवर आली असताना तिची झलक टीपतेवेळी मध्ये येणाऱ्या छायाचित्रकारांना बाजूला सारण्यासाठी बिग बी, त्या वातावरणात चक्क शिट्टी मारुन त्यांना बाजूला होण्याचा इशारा देत आहेत. आपल्या मुलीच्या रॅम्प वॉकची ही झलक टीपण्यासाठीच त्यांनी केलेले हे प्रयत्नही कॅमेऱ्यात कैद झाले असून, सोशल मीडियावर या 'सेलिब्रिटी बाबा'ची कहाणी व्हायरल होत आहे.
अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासाठी श्वेताने काही दिवसांपूर्वी रॅम्प वॉक केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सुरेख लेहंगा, जाळीदार ओढणी, खांद्यावर नक्षीकाम आणि जरीकाम असणारा शेला असा एकंदर लूक श्वेतासाठी डिझाईन करण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांची श्वेताचा एक फोटोही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सेअर केला. ज्यामध्ये त्यांनी तिच्या रुपाची आणि नजाकतीची दाद दिल्याचं पाहायला मिळालं.
एखाद्या फॅशन शोमध्ये श्वेताने रॅम्प वॉक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अनेक शोमध्ये रॅम्प वॉक केला आहे. पण, प्रत्येक वेळी तिच्या कामात दिसणारं नाविन्य आणि अर्थातच बिग बींना वाटणारं तिचं कौतुक मात्र कुतूहलाचा विषय ठरतं. श्वेता आणि बिग बींचं नाचं हे खऱ्या अर्थाने सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असणारा #likeFatherLikeDaughter हा हॅशटॅग सार्थ ठरवत आहे, असं म्हणायला हरकत नाही.