Ashish Vidyarthi after Second Wedding : बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी 25 मे रोजी दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीनं सगळ्यांना धक्काबसला होता. आशिष यांनी फॅशन डिझायनर रुपाली बरुआशी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाच्या बातमीवर प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात आशिष यांची पूर्वाश्रमीची पत्नी राजोशी यांनी सोशल मीडियावर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे. आता आशिष यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या लग्नावर आणि त्यांच्या वयावर सुरु असलेली चर्चा पाहता स्पष्टीकरण दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिष यांनी हा व्हिडीओ त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत आशिष विद्यार्थी म्हणाले की “आपल्या सगळ्याचं आयुष्य वेगळं आहे. आपल्या गरजा, आपल्याला मिळणाऱ्या संधी यादेखील वेगळ्या आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या पद्धतीने आयुष्य जगत आहे. पण, आपल्या सगळ्यांनाच आनंदी जीवन जगायचं आहे. 22 वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात पिलू म्हणजेच राजोशी आली. आमच्यात चांगली मैत्री झाली. आम्हाला एक मुलगा आहे. तो आता 22 वर्षांचा असून नोकरी करत आहे. या 22 वर्षांच्या एकत्र सहवासात आम्हाला एक-दोन वर्षांपूर्वी हे जाणवलं की, आमच्या भविष्याबद्दलच्या विचारांमध्ये बराच फरक आहे. यावर आम्ही विचार व प्रयत्नही केले. पण, एक गोष्ट लक्षात आली की आम्ही हे असचं ठेवलं तर  या सगळ्यामुळे आमच्या दोघांपैकी एक दुसऱ्यावर वरचढ होण्याची शक्यता आहे हे आम्हाला जाणवलं. त्यामुळे ज्या पद्धतीने आम्ही ही 22 वर्ष एकत्र आनंदाने घालवली, तशी ती पुढे जाणार नाहीत, हे आम्हाला जाणवलं. आम्ही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी एकत्र तर राहू पण त्यात आनंद नसेल, याची जाणीव आम्हाला झाली. आम्हाला दोघांनाही हे नको होतं."


हेही वाचा : Ashish Vidyarthi यांच्या दुसऱ्या लग्नातील काही Unseen फोटो समोर!



आशिष विद्यार्थी पुढे म्हणाले, “दोघे एकत्र राहून त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे जीवन जगणारे लोक आम्ही पाहिले आहेत. पण आम्हाला असं आयुष्य नको होतं. त्यामुळेच आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आम्हाला या गोष्टीतही प्रतिष्ठा ठेवायची होती. एकत्र राहणारी माणसं जेव्हा वेगळी होतात, तेव्हा ती काहीशी नाराज असतात. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर इतर लोक त्यावर व्यक्त होतात. पण असं काही करायचं नाही, असं आम्ही दोघांनीही ठरवलं होतं. याबाबत आम्ही आमचा मुलगा अर्थबरोबरही चर्चा केली. आमचे काही जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशीही आम्ही या संदर्भात बोललो. त्यानंतरच आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही वेगळे झालो, पण मला एकटं राहायचं नव्हतं. मला लग्न करायचं होतं. तर मी युनिव्हर्सला हेच सांगितलं आणि माझ्या आयुष्यात रुपाली आली. आम्ही एकमेकांशी जवळपास वर्षभर बोललो आणि मग एक दिवस मी म्हटल्या प्रमाणे मला रिलेशनशिप नको होती तर लग्न करायचं होतं हे मी रुपालीला सांगितलं. तिला विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील का? लग्नावर तुझा काय विचार आहे. तर रुपालीनं लगेच होकार दिला आणि आम्ही लग्न केलं. रुपाली 50 वर्षांची आहे आणि मी 57 वर्षांचा आहे. 60 वर्षांचा नाही. पण वय किती आहे यानं काहीही फरक पडत नाही. मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की, आता हे सगळं सोडून पुढे व्हा. प्रत्येक व्यक्ती त्याचं आयुष्य कशापद्धतीने जगतो याचा आदर करा. नेहमी आनंदी राहा. मला हेच तुम्हाला सांगायचं होतं. तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम."