`मला बिग बॉसमध्ये बोलावण्यासाठी...`; सलमानने झापल्याच्या Video वर अशनीरची भली मोठी पोस्ट
Ashneer Grover Reacts On Salman Khan Comment: सलमान खानने बिग बॉस 18 च्या सेटवर अशनीर ग्रोव्हरला त्याच्या एका जुन्या व्हिडीओवरुन चांगलेच फैलावर घेतल्याचं दिसून आल्यानंतर त्याने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Ashneer Grover Reacts On Salman Khan Comment: 'शार्क टँक इंडिया' या शोचा आधीचा परिक्षक अशनीर ग्रोव्हर सध्या सोशल मी़डियावर चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर अशनीरला ट्रोल केलं जात आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस 18'च्या 'विकेण्ड का वार' भागामध्ये अशनीर सहभागी झाला होता. यावेळी सलमानने अशनीरला त्याच्या एका जुन्या व्हिडीओवरुन जाब विचारला. या व्हिडीओमध्ये अशनीरने अगदी थाटात कशाप्रकारे आपण सलमानला आपल्या कंपनीसाठी कमी किंमतीत करारबद्ध करुन घेतलं याबद्दल फुशारक्या मारताना दिसत आहे. यावरुनच सलमानने अशनीरला फैलावर घेतल्यानंतर अशनीरने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
नक्की शोमध्ये घडलेलं काय?
अशनीरने सलमान खानला त्याची कंपनी 'भारतपे' चा ब्रँड अॅम्बेसिडर होण्यासाठी कशाप्रकारे विचारणा केली होती याबद्दलचा दावा केला होता. अशनीरचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालेल्या व्हिडीओंपैकी एक आहे. या व्हिडीओमध्येच अशनीरने 7.5 कोटींवरुन 4.5 कोटींवर आणल्याचं सांगितलं होतं. सलमान खानने या व्हिडीओचा उल्लेख करत, 'माझी तुझ्यासोबत कधीच खासगी बैठक झाली नसून शोच्या टीमच्या माध्यमातून पहिल्यांदा नाव ऐकलं,' असं सांगितलं. सलमान खानची टीम 7.5 कोटी मागत असताना आपण फक्त 4.5 कोटीत साईन केल्याचा दावा अशनीरने केला होता. तसेच मी सलमानबरोबर तीन तास एकत्र बसलो होतो. त्याच्या मॅनेजरने फोटो काढल्यावर त्यांना राग येतो सांगितल्याने मी फोटोही काढला नव्हता असं अशनीर म्हणाला होता.
सलमानने अशनीरला झापलं
सलमान खान त्या पॉडकास्टचा उल्लेख करत म्हणाला की, "मी तुझा एका व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये तू काही दावे केले आहेस आणि काही आकडे सांगितले असून मला इतकी रक्कम देऊन साईन केल्याचं सांगितलं आहेस. हे सर्व खरं नाही. असा चुकीचा आभास निर्माण करणे चुकीचे आहे." अशनीर यादरम्यान सलमान खानला आपली चूक झाल्याचं सांगत, चुकीचा अर्थ लावल्याचं समजावून सांगत होता. "मला फक्त हे सांगायचं होतं की तुम्हाला आमच्या ब्रँडसाठी नियुक्त करणं हा आमचा सर्वात योग्य निर्णय़ होता. तो आमच्यासाठी खूप फायदेशीर ठरला," असं अशनीर बाजू मांडताना म्हणाला. त्यावर सलमान पुढे बोलताना, "ज्याप्रकारे तू आता माझ्याशी बोलत आहे, तो अॅटिट्यूड त्या व्हिडीओत दिसत नव्हता. आता आहे तो चांगला अॅटिट्यूड आहे", असं अशनीरला म्हणाला. त्यानंतर अशनीर ग्रोव्हरने माफी मागताना, "सॉरी सर, जर तुम्हाला तसं वाटलं असेल. पण माझा तसा हेतू नव्हता," असं सांगितलं. मात्र या साऱ्या प्रकरणानंतर अनेकांनी अशनीरची बोलती कशापद्धतीने सलमानसारख्या दमदार व्यक्तीमत्वासमोर बंद झाली असं म्हणत त्याला ट्रोल केलं.
अशनीरची पहिली प्रतिक्रिया अन् ती यादी
आता या ट्रोलिंगनंतर अशनीरने सोशल मीडियावरुन सलमानबरोबर सेटवर झालेल्या भेटीचा फोटो शेअर करत प्रतिक्रिया नोंदवली आहे. "मला अपेक्षा आहे की तुम्ही 'बिग बॉस 18'चा 'विकेण्ड का वार'चा भाग एन्जॉय केला असेल. मला फार मज्जा आली. या भागाला चांगला टीआरपी/ व्ह्यूअरशीप मिळाली असेल अशी मला खात्री आहे. खालील माझी सर्व वक्तव्य खरी आहेत," असं म्हणत अशनीरने एक यादीच पोस्ट केली आहे.
- सलमान हा चांगला होस्ट आणि अभिनेता आहे.
- सलमानला बिग बॉस कसं काम करतं हे माहितीये.
- मी सलमानचं कायमच स्वत:बद्दल असलेली जागृकता आणि उद्योगासंदर्भातील दृष्टीकोनासाठी कौतुकचं केलं आहे. मी कधीच त्याला अवमान होईल असं विधान केलेलं नाही.
- मी डायल केलेले क्रमांक कायमच बरोबर होते. (बँक आणि ऑडिटरकडून व्हेरिफाय करुन सांगतोय)
- मी सलमानला मे 2019 मध्ये जुहूमधील जे. डब्ल्यू. मॅरिएटमध्ये तीन तास ब्रॅण्ड कोलॅब्रेशनसाठी भेटलो होतो. त्यावेळी जाहिरातीचा दिग्दर्शकही सोबत होता. (त्याला मी आठवत नसेल तर हरकत नाही. त्यावेळी मी फार प्रसिद्ध नव्हतो. तो अशा अनेकांना भेटत असावा.)
- मला बिग बॉसमध्ये बोलवण्यासाठीच्या आमंत्रण निनावी नव्हतं. त्याचप्रमाणे मला देण्यात आलेला चेकही निवावी नव्हता.
आपल्या पोस्टच्या शेवटी अशनीरने, "सर्वात शेवटी म्हणजे आता माझा सलमानबरोबर फोटो आहे जो आधीच्या भेटीत काढला नव्हता. धन्यवाद सलमान, किप रॉकिंग," असं म्हटलं आहे.