बॉलिवूड अभिनेत्याची गळफास घेवून आत्महत्या
नैराश्यमुळे अभिनेत्याने आपले जीवन संपवले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
धर्मशाला : 'Once Upon A Time in Mumbai'फेम अभिनेता आसिफ बसराने (Asif Basra) गळफास घेवून आत्महत्या केली आहे. गुरुवारी, हिमाचल प्रदेशच्या कांग्रा जिल्ह्यातील धर्मशाला (धर्मशाळा) येथे बसरा याने मॅकलॉडगंजमधील जोगीबाडा रोडवरील कॅफेजवळ असलेल्या घरात आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अभिनेत्याने आत्महत्या करण्यामागचं मुख्य कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलिस अधिक्षक विमुक्त रंजन यांनी दिली आहे.
पोलिसांनी बसराचं मृतदेह ताब्यात घेतलं असून याप्रकरणी पुढील तपास करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या ५ वर्षांपासून अभिनेता बसरा मॅकलॉडगंज येथे भाड्याच्या घरात राहत होता. त्यासोबत एक परदेशी महिला मैत्रीण देखील राहत असल्याचं समोर आलं आहे.
नैराश्यमुळे अभिनेत्याने आपले जीवन संपवले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान गुरूवारी दुपारी तो त्याच्या कुत्र्याला घेवून फिरायला गेला होता. घरी येताच त्याने कुत्र्याच्या गळ्यातील दोराने गळफास घेवून जीवन प्रवास संपवला आहे. या प्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.