मुंबई : अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या कारकिर्दीतील अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आयुष्मानचे 'बाला'पूर्वीचे जवळपास सर्व चित्रपट हे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करुन गेले, ज्याचे थेट परिणाम त्या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांमध्ये पाहायला मिळाले. साधारण आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'बाला' या चित्रपटाची कमाई सातव्या दिवशीही चढच्या आलेखाच्याच रुपात दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाच्या कमाईचे आकडे सर्वांसमोर आणले. भारतामध्ये आतापर्यंत बालाने ७२.२४ कोटी रुपयांची कमाई केली असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं. 


'स्त्री' या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अमर कौशिक याने बालाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली. अभिनेत्री भूमी पेडणेकर, यामी गौतम आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांच्या साथीने दिग्दर्शकाने एक असं कथानक साकारलं जे सर्वसामान्यांच्या हृदयाचा ठाव घेणारं होतं. 



ऐन तारुण्यात केस गळतीचा सामना करत अखेर टक्कर पडलेल्या 'बाला'ची कथा पाहताना प्रेक्षकांचं मनोरंजन तर झालंच. पण, त्यासोबतच त्यातून काही महत्त्वाचे संदेशही मिळाले. मुख्य म्हणजे या चित्रपटातील मुख्य कलाकारच नव्हे, तर सहाय्यक कलाकारांनीही त्यांच्या दमदार अभिनयाने चित्रपटात जीव ओतला होता. कलाकारांच्या याच अफलातून अभिनयाच्या बळावर 'बाला'च्या वाट्याला हे यश आलं. मुख्य म्हणजे रणवीर, रणबीर, अक्षय कुमार या कलाकारांच्या शर्यतीत आयुष्माननेही त्याचं स्थान मिळवलं. चित्रपटांची निवड करण्यापासून ते कामासोबत कुटुंबालाही प्राधान्य देणाऱ्या आयुष्मानने खऱ्या अर्थाने या कलासृष्टीत त्याचं अस्तित्व सिद्ध केलं आहे.