मुंबई : ‘झी मराठी’वर सध्या सुरू असलेल्या ग्रहण या मालिकेतील गूढ आता लवकरच उकलणार आहे कारण ही मालिका आता शेवटाकडे आली असून या आठवड्यातच ती प्रेक्षकांचा निरोप घेईल. त्यानंतर या मालिकेच्या जागी तितकीच उत्कंठावर्धक कथा असलेली, पेशवाईच्या काळ असणारी ‘बाजी’ ही नवीन मालिका येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘ग्रहण’ मालिकेचे चित्रीकरण गेल्या महिन्यातच पूर्ण झाले आहे. या आठवड्याच्या अखेरीस ही मालिका संपेल. तिच्या जागी पुन्हा एकदा शंभर भागांचीच मर्यादित कथा असलेली ‘बाजी’ ही नवीन मालिका दाखवली जाणार आहे. पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती. त्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’ची काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे. त्या वेळी ‘शेरा’ नावाच्या एका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते आणि पेशव्यांना संपवण्यासाठी त्याला शंभर दिवसांची मुदत देण्यात आली होती, असे या मालिकेचे कथानक आहे. थोडीशी गो. नी. दांडेकरांच्या कादंबऱ्यांची जी शैली आहे त्या पद्धतीची ही कथा आहे, अशी माहिती ‘झी मराठी’चे व्यवसाय प्रमुख नीलेश मयेकर यांनी दिली. मालिकेचे कथानक ऐतिहासिक धर्तीवरील असले तरी कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. त्याकाळी घडलेल्या काही वास्तव घटनांचा संदर्भ मात्र घेण्यात आला आहे, असेही मयेकर यांनी स्पष्ट केले.



"आम्ही सातत्याने मालिकांच्या बाबतीत वेगळे प्रयत्न केले आहेत. ‘बाजी’ हाही एक अनोखा प्रयत्न आहे. त्या वेळी पुण्यात तळ्यातील गणपती चोरीला गेला होता, त्यानंतर तळेगावातील पेशव्यांच्या गोदामांना आग लावण्यात आली होती, कात्रजच्या तलावात विष टाकण्यात आले होते, अशा काही घटनांचा संदर्भ घेत ही कथा गुंफण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. या मालिकेसाठी स्पेशल इफेक्टस्चा भरपूर वापर करण्यात आला आहे. सासवड, भोरचा वाडा अशा ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले असून मालिकेचे सत्तर टक्के चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ऑगस्टमध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या प्रेक्षकांना मर्यादित भागांच्या मालिका आवडतात. त्यामुळे नवनवीन कथा, मांडणी असलेल्या मर्यादित मालिका देण्याचाच आम्ही प्रयत्न करतो. काही प्रेक्षकांना दीर्घ मालिकाही आवडतात पण सासू-सुनांचा विषय मागे टाकून काहीतरी वेगळा विषय मांडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळतील", असे मयेकर यांनी सांगितले.