Badshah New Song controversy : लोकप्रिय बॉलिवूड गायक आणि रॅपर बादशाह (Badshah) त्याच्या रॅप्ससाठी ओळखला जातो. त्याची गाणी ही तरुणांमध्ये नेहमीच चर्चेत राहतात. नुकतंच बादशाहचं 'सनक' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. यावेळी मात्र, बादशाह या गाण्यामुळे ट्रोल झाला आहे. त्यानंतर बादशाहनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सगळ्यांची माफी मागितली आहे. कारण अनेकांनी बादशाहच्या या नवीन गाण्याच्या लिरिक्सवर आक्षेप घेतला आहे. आता बादशाहनं माफी मागितल्याची पोस्ट चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बादशाहनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बादशाहनं एक नोट शेअर केली आहे. या नोटमध्ये बादशाह म्हणाला, 'माझ्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सनक’ या गाण्याने काही लोकांच्या भावना दुखावल्याचे मला समजले आहे. मला कधीच कळत-नकळत सुद्धा कोणाला दुखवायचे नव्हते. मी माझी कलात्मक निर्मिती आणि संगीत रचना तुमच्यासाठी, माझ्या चाहत्यांसाठी, खूप प्रामाणिकपणे आणि उत्साहाने घेऊन येत असतो.'



पुढे बादशाह म्हणाला, 'नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर ठोस पावलं उचलत मी माझ्या गाण्यांचे काही भाग (लिरिक्स) बदलले आहेत. सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर जुने व्हर्जन काढून टाकत त्याजागी नवीन व्हर्जन प्रदर्शित होईल, पण त्या संपूर्ण प्रक्रियेला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवा. मी जर चुकून कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर माफी मागतो. मला माफ करा. माझे चाहते माझा सर्वात मोठा आधार आहेत, म्हणूनच मी त्यांना नेहमीच महत्त्व देतो आणि त्यांच्यावर खूप प्रेम करतो. तुम्हा सर्वांना माझे खूप खूप प्रेम'. 


काय होता बादशाहच्या या गाण्याचा वाद?


बादशाहच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यावरून वाद निर्माण होण्याचं कारण हे त्या गाण्यात बादशाहनं महादेवाच्या नावाचा वापर केला होता. त्यानंतर महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यानं बादशाहला सुनावलं होतं. उज्जैन महाकालेश्वर मंदिराचे पुजारी यांनी महादेवाच्या नावाचा वापर कोणत्याही आक्षेपार्ह शब्दात घेतल्यानं सुनावलं होतं. यावेळी त्यांनी हे देखील सांगिलतं होतं की गाण्यात बदल केले नाहीत तर बादशाह विरोधात एफआयआर दाखल करेन. 


दरम्यान, बादशाह विषयी बोलायचे झाले तर त्यानं आजवर अनेक गाजलेली गाणी दिली आहेत. प्रत्येक गाण्यात बादशाहचं एक वेगळं रुप पाहायला मिळतं. इतकंच काय तर बादशाहच्या गाजलेल्या गाण्यांमध्ये काला चष्मा, गर्मी, पाणी पाणी, बच्चपण का प्यार या गाण्यांचा समावेश आहे.