मुंबई : 'बाहुबली' आणि इतर दाक्षिणात्य चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या चाहत्यांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. फक्त दाक्षिणात्य कलाविश्वातच नव्हे, तर हिंदी कलाविश्वात आणि चाहत्यांच्या वर्तुळातही तिची बरीच लोकप्रियता पाहायला मिळत आहे. अनुष्काची अशी एकाएकी चर्चा होण्यामागचं कारण आहे, तिच्यात झालेला एक महत्त्वाचा बदल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही फोटोंमध्ये अनुष्का बरीच बारीक दिसत आहे. एकंदरच गेल्या काही काळात तिने स्वत:वर बरीच मेहनत घेतली असून शारीरिक सुदृढतेला महत्त्व दिल्याचं स्पष्ट होत आहे. चित्रपटांतील भूमिकांसाठी अनुष्काने वजन वाढवलं होतं. ज्यानंतर मात्र पुन्हा तिने आपलं वजन नियंत्रणात आणल्याचं पाहायला मिळत आहे. 


'द मॅजिक वेट लॉस पिल', असं लिहिलेला एक फोटो तिने पोस्ट केला आहे. हे अनुष्काने तिच्या फिटनेस गुरू ल्यूक कोटिन्हो यांच्या साथीने लिहिलेल्या एका पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर झळकणाऱ्या अनुष्काचं रुप पाहून थक्क व्हायला होत आहे. 



मुख्य म्हणजे आपल्यात झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या बदलाचं रहस्य आणि वजन कमी करण्याचे जवळपास ६२ उपाय याविषयी तिने या पुस्तकात लिहिलं आहे.  त्यामुळे निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी आता थेट ही 'देवसेना'च तुम्हाला मदत करणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. 


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अनुष्याकाच्या नावाचा समावेश होतो. सध्या ती आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे. असं असलं तरीही 'बाहुबली'मुळे झालेली तिची प्रतिमा मात्र काहीच बदललेली नाही. अभिनेता प्रभास सोबतच्या बहुचर्चित 'मैत्री'च्या नात्यामुळेही ती कायमच चर्चेत असते.