शिवसेनेच्या प्रचारात अभिनेत्रीला अपमानास्पद वागणूक
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
नागपूर : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने चंद्रपूर येथे नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेली होती. पण यावेळेस शिवसेनेकडून योग्य वागणूक मिळाली नसल्याचा आरोप तिने केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे राजुरा विधानसभेचे संपर्क प्रमुख मिथुन खोपडे यांनी माफी मागावी अशी मागणी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विमानतळावर ७.४५ वाजता उतरल्यानंतर मला तासभर कोणी घ्यायला आले नाही. शिवाय आमच्या राहण्याची व्यवस्था देखील चंद्रपूर येथे करण्यात आली नव्हती. तर मेकअपसाठी तुम्ही तुमचं बघा आणि त्यासाठी पैसे तुम्हाला भरावे लागतील. त्याचप्रमाणे रिर्टन तिकीटांची देखील व्यवस्था करण्यात आली नसल्याचे तिने सांगितले.
प्रचार रॅली संपल्यानंतर तिच्या झोपण्याची सोय मिथुन खोपडे यांच्या नातेवाईकाच्या घरी करण्यात आली असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. पण मिथुन खोपडे यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. भाग्यश्री यांना ठरलेलं मानधन दिल्यानंतर पुन्हा १५ हजार रूपयांची मागणी केली असं वक्तव्य मिथुन खोपडे यांनी झी २४ तास सोबत बोलताना केलं.
भाग्यश्रीने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. 'देवयानी', 'प्रेम हे' या मालिकांच्या माध्यमातून ती प्रसिद्धीझोतात आली होती. तर 'सीया के राम' या मालिकेमध्ये सुद्धा तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती.