मुंबई : कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ ची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसृष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. आजवर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि नाटकांना हक्काचं व्यासपीठ देऊन त्यांच्या प्रसिद्धीची हवा घरोघरी निर्माण करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आगामी मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी या मंचावर हजेरी लावणे सर्व कलाकारांना गरजेचे वाटते.  या आठवड्यात चला हवा येऊ द्या च्या मंचावर सुप्रसिद्ध रंगकर्मी आणि महाराष्ट्राचे आवडते अभिनेते भरत जाधव आणि संजय नार्वेकर सज्ज होणार आहेत.


भरत जाधव आणि संजय नार्वेकर हे त्यांच्या नाटकाच्या प्रसिद्धीसाठी थुकरटवाडीची वाट धरली. यावेळी या नाटकातील त्यांचे सहकलाकार देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत थुकरटवाडीच्या मंडळींनी एकच धम्माल उडवून दिली आणि या सर्वाला भरत आणि संजय यांनी खळखळून दादही दिली. एकंदरीत धम्माल मजा मस्तीने परिपूर्ण हा मनोरंजक भाग येत्या सोमवारी व मंगळवारी रात्री ९.३० वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.