मुंबई : आतापर्यंत गमतीशीर नावांचे अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, आता प्रेक्षकांना आगळंवेगळं 'बिस्किट' चाखायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"बिस्किट" या नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. एक्स्पान्शन फिल्म्स प्रा. लि.च्या पद्मश्री शेवाळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून कथा ही त्यांचीच आहे. रवींद्र शेवाळे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. सचिन दरेकर यांची पटकथा, नामदेव मुरकुटे यांचे संवाद, किशोर राऊत यांचे छायांकन आणि चैतन्य आडकरचे सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभले आहे.


अभिनेते शशांक शेंडे, पूजा नायक , जयंत सावरकर, अशोक समर्थ आणि बालकलाकार दिवेश मेदगे यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. एका लहान मुलानं घेतलेल्या विलक्षण शोधावर हा चित्रपट बेतला असून या टीजर पोस्टरनं चित्रपटाविषयी कमालीची  उत्सुकता निर्माण केली आहे. 


आता हे "बिस्किट" आजवरच्या चित्रपटांपेक्षा किती वेगळं आणि चविष्ट आहे, यासाठी चित्रपट प्रदर्शित होण्याची थोडी वाट पहावी लागणार असून येत्या नोव्हेंबर महिन्यात ह्या "बिस्किट" चा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल.