Kedar Shinde The Kerala Story Comment: 'द केरळ स्टोरी' चित्रपटावरुन (The Kerala Story) देशभरामध्ये वाद सुरु असतानाच महाराष्ट्रातही या वादाची ठिणगी पडली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी 'द केरळ स्टोरी' चित्रपटाचे स्पेशल शो महाराष्ट्रात आयोजित केले जात असल्याच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरुन केदार शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचे (BJP) आमदार अतुल भातखळकर यांनी केदार शिंदेंच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.


केदार शिंदे काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केदार शिंदे यांनी 8 मे रोजी ट्वीटरवरुन 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना 'द केरळ स्टोरी'च्या स्पेशल शोबद्दल भाष्य केलं होतं. "दुर्दैव... महाराष्ट्रात "केरला स्टोरी" या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र शाहीर" प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?" असा सवाल केदार शिंदेंनी उपस्थित केला.



भाजपा आमदाराने केदार शिंदेंना केलं लक्ष्य


केदार शिंदेच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केदार शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. "हा चित्रपट केवळ महाराष्ट्रात चालत नाही तर देशभरात चालतोय. कारण तो जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि तो चित्रपट चालला तर तुमच्या पोटात का दुखतंय? हिंदूंच्या हिताच्या चार गोष्टी समोर येत आहेत म्हणून? मी एवढं सांगेन की, कोरोनाच्या काळात तुम्हाला न्यूझीलंडला जाऊन रहावं वाटलं ही तुमची देशभक्ती. उगाच हिंदुत्वाच्या आणि हिंदू समाजाच्या हिताच्या आड येण्याचा प्रयत्न करु नका," असा टोला भातखळकर यांनी केदार शिंदेंना लगावला आहे.


ठाण्यात राष्ट्रवादीकडून 'महाराष्ट्र शाहीर'चे मोफत शो


दरम्यान, चित्रपटाला चित्रपटाने उत्तर देण्याच्या उद्देशाने ठाण्यामधील प्रताप टॉकीज चित्रपटगृहामध्ये पुढील तीन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट दाखवला जाणार आहे. तुम्ही द्वेष पसरवणार असाल तर आम्ही प्रेम पसरवू असं म्हणत 'महाराष्ट्र शाहीर'चे विशेष मोफत शो आयोजित करत असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.