मुंबई : कंगनाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चहुबाजूंनी टीका होत असताना आता कंगनाला मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा इशारा दिला आहे. कंगनाच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयावर सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अचानक धाड टाकण्यात आली. या प्रकरणाबाबत आता बीएमसीने 'क्वीन' कंगनाला अवघ्या चोवीस तासाचा कालावधी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एच पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त, विनायक विसपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार,'आम्ही कंगनाला २४ तासांचा वेळ दिला आहे. २४ तासात तिने तिच्या कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामाबाबत संयुक्तिक स्पष्टीकरण दिले नाही, तर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत. बीएमसीला फक्त स्पष्टीकरण नकोय, ते संयुक्तिकही असायला हवं.  या बांधकामाबद्दल तिचं म्हणणे ती मांडेल. आम्ही पूर्णपणे पाहणी करून हे अनधिकृत बांधकाम नोटीसमध्ये सांगितलं आहे. 


कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाले आहे का, याची पाहणी करण्यासाठी सोमवारी धाड टाकण्यात आली.  ज्यानंतर समोर आलेली माहिती पाहता कार्यालयाची उभारणी करतेवेळी काही नियमांचं उल्लंघन केलं गेल्याचं म्हटलं जात आहे. 


सदर बांधकामात निवासी वापर क्षेत्राचं रूपांतर व्यावसायिक वापर क्षेत्रात केल्याचं पाहणीत उघड झाल्याची  माहिती आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती महापालिकेकडे प्राप्त झाल्यानं बीएमसीच्या एच पश्चिम विभागाच्या अधिका-यांकडून कंगनाच्या ऑफिसची तपासणी करत कोणकोणत्या नियमांचे उल्लंघन झालेले आहे, याबाबतीतला संपूर्ण अहवाल दोन दिवसांत तयार केला गेला.



 मुंबईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि मुंबई पोलिसांबद्दलही चुकीचं वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिला होणारा विरोध सातत्यानं वाढत असचानाच तिच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत येणार आहे. याकरता कंगनाला केंद्र सरकारकडून 'Y' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.