मुंबई : चित्रपटांच्या बाबतीत अतिशय 'परफेक्ट' असणाऱ्या अभनेता आमिर खान याने सोशल मीडियाचा आधार घेत एक अत्यंत महत्त्वाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. हा संदेश आहे, मानसिक आरोग्याविषयीचा. आमिर नेहमीच काही महत्त्वाच्या मुद्यांवर त्याचं मत मांडत असतो. अशा या अभिनेत्याने नुकतच मोठ्या हक्काने एक सल्ला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिरने दिलेला हा सल्ला सर्वांसाठी अतिशय फायद्याचा ठरणार, असं म्हणायला हरकत नाही. जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह अर्थात #worldmentalhealthweek2019 च्या निमित्ताने आमिरने एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने शारीरिक सुदृढता आणि आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही किती महत्त्वाचं असतं हे पटवून दिलं आहे. 


'व्यक्त करण्यास कठिण वाटणाऱ्या भावनांविषयी सतर्क असणं आणि त्या भावना इतरांकडे व्यक्त करणं तितकंच महत्त्वाचं आहे. व्यायामाचे काही प्रकारही तणाव आणि नैराश्य़ दूर करतात. या समस्यांशी सुरुवातीलाच टक्कर दिल्यास नैराश्यग्रस्त होण्यापासून दूर राहता येतं. नैराश्य हे कोणालाही येऊ शकतं. त्यामुळे वेळीच लक्ष द्या.... हे मदतीचं ठरेल.... ', असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. 



आमिरची ही पोस्ट अनेकांसाठी फायद्याची ठरणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे त्याने ही पोस्ट शेअर करताच अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली, त्याच्या या प्रयत्नांची दादही दिली.