मुंबई : बायोपिक आणि देशभक्ती या दोन गोष्टींची सांगड घालत एक अनोखी आणि सत्यकथा प्रेक्षकांसाठी रुपेरी पडद्यावर साकारण्यात येणार आहे. बायोपिकला प्रेक्षकांची मिळणारी पसंती आणि त्यानिमित्ताने काही कर्तृत्ववान व्यक्तींची कारकिर्द उलगडणारा जीवनप्रवास या गोष्टींची घडी बसवत पुढच्या वर्षी असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याविषयीची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भुज- प्राइड ऑफ इंडिया' असं या चित्रपटाचं नाव असून अजय त्यात भूमिका साकारणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या चित्रपटात तो स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान, त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अभिषेक दुधैया या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, गिन्नू खनूजा, वजिर सिंग, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अभिषेक दुधैया यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे. 



सध्याच्या घडीला भारतीय सेना, संरक्षण दल, त्यामध्ये कार्यरत असणारे जवान यांचीच सर्वत्र चर्चा होत असून, देशभक्तीची भावना ओसंडून वाहत आहे. याच धर्तीवर प्रेक्षकांना देशभक्तीचे अनोखे रंग दाखवत, एक वेगळी आणि तितकीच महत्त्वाची शौर्यगाथा या चित्रपटाच्या निमित्ताने पाहता येणार आहे. दरम्यान, सध्या अजय 'दे दे प्यार दे' आणि 'तानाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. यानंतर तो फुटबॉल प्रशिक्षक सैय्यद अब्दुल रहीम यांच्या बायोपिकचं चित्रीकरण सुरू करणार आहे. त्यामुळे येत्या काळात अजय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी खऱ्या अर्थाने सज्जा आहे असं म्हणायला हरकत नाही.