मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या '2.0' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चेन्नई येथे पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यानंतर सर्वत्र याच चित्रपटाच्या चर्चा पाहायला मिळाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य भूमिकेत सुपरस्टार रजनीकांत आणि खलनायकी भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार, दिसणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


अवघ्या दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये रजनीकांत यांच्या लूकची चर्चा झालीच. पण, त्यासोबतच खिलाडी कुमारच्या खलनायकी रुपावरही प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या. याच खलनायकी रुपात येण्यासाठी नेमका किती वेळ गेला यावरुन आता खुद्द अक्षयनेच पडदा उचलत एक पोस्ट केली आहे. 


'एक अभिनेता ज्याने कधीच त्याच्या कारकिर्दीत मेकअपचा फारसा वापर केला नाही, त्याच्यासाठी '2.0' हा चित्रपट म्हणजे एक वेगळाच अनुभव होता, असं म्हणत चित्रपटाचील खलनायकी रुपात येण्यासाठी एका अभिनेत्रीला तयार होण्यास जितका वेळ लागतो त्याहूनही जास्त वेळ आपण घेतल्याचं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 



अफलातून व्हीएफएक्स आणि नव्या तंत्रज्ञानाचा डोळे दीपवणारा प्रयोग या चित्रपटातून पाहता येणार असल्याची चिन्हं आहेत. २९ नोव्हेंबरला हा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यात खिलाडी कुमार आणि रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त एमी जॅक्सन, आदिल हुसैन आणि सुधांशू पांडे हे चेहरेसुद्धा झळकणार आहेत.