पंतप्रधान मोदींनी माझी विकेटच घेतली - अक्षय कुमार
त्यावेळी कुठे पाहावं, कसं व्यक्त व्हावं हेच मला कळत नव्हतं
मुंबई : loksabha election 2019 लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीतच खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वेगळी बाजू सर्वांसमोर आणली. एका अराजकीय मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या व्य़क्तीमत्त्वाचे अनेक पैलू सर्वांसमोर उलगडले गेले. याच मुलाखतीसाठी खुद्द अक्षय कुमारच्या मनावरही बरंच दडपण होतं. अर्थात दडपण येणं अपेक्षितही होतं. कारण, देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असणाऱ्या व्यक्तीशी मोठ्या खेळीमेळीने संवाद साधत तितक्याच सावधगिरीने त्यांच्या पदाचा मान राखत सारंकाही निभावून नेणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण, अक्षयने ती निभावून नेली. सोशल मीडियावर ही मुलाखत गाजली आणि अक्षयच्या प्रश्नांना मोदींनी दिलेल्या उत्तरांच्याच चर्चांनी तग धरला.
मोदींना विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांमध्ये फारसं गांभीर्य नव्हतं असं मतप्रदर्शनही काहींनी केलं. पण, 'मी एक सर्वसाधारण व्यक्ती असून, राजकारण, सरकार आणि राजकीय योजनांबद्दल प्रश्न न विचारल्याची मला खंत वाटत नाही', असं अक्षयने 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. पंतप्रधानांची मुलाखत घेण्याच्या अनुभवाचं कथन त्याने यावेळी केलं. या मुलाखतीदरम्यान मोदींनी अक्षयच्या पत्नीचा म्हणजेच ट्विंकल खन्ना हिचाही उल्लेख केला. तो पाहता, मोदींचं वक्तव्य ऐकून आपल्याला नेमकं कुठे पाहावं, कसं व्यक्त व्हावं हे कळेनासंच झालं होतं, अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली. मोदींनी आपली विकेटच घेतली, अशा आशयाचं वक्तव्य करणाऱ्या खिलाडी कुमारची एक प्रकारे त्यावेळी भंबेरीच उडाली होती.
'एकीकडे पत्नी आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान. दोघांचंही माझ्या आयुष्यात भक्कम स्थान.... त्यामुळे अशा वेळी मौन पाळणंच योग्य होतं', असं तो म्हणाला. या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांविषयी पंतप्रधानांच्या कार्यालयातून काही सूचना देण्यात आल्या होत्या का, असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. त्यावर 'अलाद्दीनचा चिराग आणि गुजराती समुदायावरील विनोद करण्याला मला कोणी परवानगी दिली असती?', असा प्रतिप्रश्न त्याने केला. ही मुलाखत पूर्णपणे एका टेकमध्येच घेण्यात आली असून, कोणत्याही प्रकारची तालीम वगैरे घेण्यात आली नव्हती ही महत्त्वाची बाब त्याने स्पष्ट केली.
पंतप्रधानांची मुलाखत घेण्यापूर्वी मनावर एक प्रकारचं दडपण होतंच.अर्थातच हे माझ्यासाठी एक नवं क्षेत्र होतं. पण, त्यांनी या संपूर्ण मुलाखतीत मला कुठेच संकोचलेपणा वाटू दिला नाही हे अक्षयने न विसरता सांगितलं. त्यामुळे आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीत अक्षय कुमारसाठी ही अराजकीय मुलाखत कायमच अविस्मरणीय राहील यात शंका नाही.