मुंबई : सारागढीच्या युद्धाची गाथा सांगणारा आणि अभिनेता अक्षय कुमारची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'केसरी' या चित्रपटाला सध्या समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या सुट्टीच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, या साऱ्यामध्ये चित्रपटाच्या वाटचालील पायरसीचा अडथळा आला आहे. मोठमोठे चित्रपट लीक होण्याच्या या सत्रात आता 'केसरी'च्याही नावाची भर पडली आहे. तमिलरॉकर्सकडून हा चित्रपट लीक करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्मिती खर्चासाठी प्रचंड आर्थिक गणितं मांडत साकारण्यात आलेला हा चित्रपट सोशल मीडिया आणि इंटरनेट उपलब्धतेच्या माध्यमातून व्हायरल होत असल्याचं कळत आहे. चित्रपटाने कुठे कमाईच्या आकड्यांमध्ये भर टाकण्यास सुरुवात केली होती, तोच पायरसीचा फटका आता त्यावर परिणाम करण्याची चिन्हं आहेत. एखादा बिग बजेट चित्रपट लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा गली बॉय, मणिकर्णिका..., सिम्बा, टोटल धमाल आणि असे अनेक चित्रपट तमिलरॉकर्स या वेबसाईटवर लीक झाले होते. 


ऑनलाईन पायरसीला आळा घालण्यासाठी कितीही प्रयत्न करण्यात आले तरीही कलाविश्वावर असणारं हे संकट काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. ज्याचे परिणाम चित्रपट व्यापारावर आणि कमाईच्या आकड्यांवरही होत आहेत. अनेकदा फेसबुकच्या माध्यमातूनही चित्रपट लीक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचाही ऑनलाईन पायरसीसाठी वापर केला जातो हेच स्पष्ट होत आहे.