मुंबई : अमिताभ बच्चन म्हटलं की डोळ्यासमोर एक उंच, देखणं रुप उभं राहतं. भारदस्त व्यक्तीमत्त्वावर नजरा खिळतात आणि या अभिनेत्याच्या प्रेमात आपण सर्वजण दंग होतो. कला जगतामध्ये बच्चन... यांच्या नावाला वेगळंच वजन प्राप्त आहे. पण, मुद्दा इथंच थांबत नाही, कारण काहींसाठी बच्चन म्हणजे गर्विष्ठ व्यक्ती होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांच्यावर घमेंडी आणि स्वार्थी म्हणूनही काहींनी टीका केली. पण, 1979 रोजी एक प्रसंग असाही आला जेव्हा त्यांच्यातील खरा माणूस सर्वांची मनं जिंकून गेला. 


हा किस्सा आहे, 'द ग्रेट गॅम्बलर'च्या चित्रीकरणादरम्यानचा. चित्रपटामध्ये अभिनेता अमजद खान महत्त्वाची भूमिका साकारणार होते. ज्यासाठी ते चित्रीकरणाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबासह रस्तेमार्गानं गोव्याला निघाले. (Amitabh bachchan Amjad khan)


खान यांच्या आधीच बच्चन तेथे पोहोचले होते. पण, तिथे त्यांच्या कानावर जी बातमी आली, ती पुरती हादरवणारी होती. 


वाटेतच अमजद खान यांचा भीषण अपघात झाला होता. कसंबसं त्यांनी पत्नी आणि मुलांसह स्वत:ला एका रुग्णालयात दाखल करुन घेतलं होतं. तिथेच खान कोमात गेले. 


भीषण अपघातामुळे अमजद खान यांच्या हाडांना जबर मार लागला होता. ज्यामुळं त्यांच्या फुफ्फुसात छिद्र तयार झालं होतं. खान यांना श्वासही घेता येत नव्हता. 


त्याचवेळी अमिताभ बच्चन रुग्णालयात आले. जिथं त्यांना सर्व परिस्थितीची माहिती देण्यात आली. लगेचच खान यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. पण, चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी कोणीही तिथं नसल्यामुळं कोणीही रुग्णालयाच्या कागदपत्रांवर जबाबदारीनं सही करण्यास पुढे आलं नव्हतं. 


एका मुलाखतीमध्ये बच्चन यांनी या प्रसंगाचा खुलासा केला. त्यावेळी त्यांनीच खान यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. रुग्णालयातील कागदपत्रांवर सही करत शस्त्रक्रियेसाठी पुढची पावलं उचलण्यास त्यांनी सांगितलं होतं. 


हे सगळं करत असताना बच्चन यांनी खान कुटुंबाशीही सल्लामसलत केली. ती वेळच अशी होती की अमजद जगतील की नाही कोणालाही ठाऊक नव्हतं. 



सुदैवानं शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि तातडीने अमजद खान यांना एका खासगी विमानानं मुंबईला आणण्यात आलं. काही दिवसांनी त्यांची प्रकृती सुधारु लागली आणि हा संपूर्ण काळ बच्चन यांची अमजद खान यांच्याशी असणारं मैत्रीचं नातं आणखी घट्ट करुन गेला. 


मैत्री करणं अगदी सोपं असतं. पण, ती टिकवणं आणि त्याहूनही ती निभावणं कठीण असतं. मुळात मैत्री करताही आली पाहिजे आणि ती खऱ्या अर्थानं जगताही आली पाहिजे हेच बच्चन आणि अमजद खान यांच्यासोबत घडलेला हा प्रसंग सांगून जातो... नाही का?