मुंबई पोलिसांकडून महानायक बच्चन यांना हटके शुभेच्छा
दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुंबई : हिंदी कलासृष्टीत कित्येक वर्षांचा काळ गाजवणाऱ्या आणि अभिनय कौशल्याने या कलेचा दर्जा आणखी उंचावणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावे नुकतीच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार मिळणार असल्याचं जाहीर होताच सर्व स्तरांतून त्यांना शुभेच्छा देण्याचं सत्र सुरू झालं.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकानेच शक्य त्या परिने या चिरतरुण 'एँग्री यंग मॅन'ला शुभेच्छा दिल्या. यामध्ये पोलीस यंत्रणाही मागे राहिलेली नाही. एरव्ही गुन्हेगारांच्या शोधात असणाऱ्या पोलिसांनी थेट बच्चन यांना शुभेच्छा देतच साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
मुख्य म्हणजे मुंबई पोलिसांच्या या शुभेच्छा पाहता, या बिग बींना मिळालेल्या आतापर्यंतच्या सर्वात कलात्मक आणि त्यांच्या कारकिर्दीला साजेशा शुभेच्छा आहेत असं म्हणायला हरकत नाही. बिग बींनी साकारलेल्या इन्स्पेक्टर विजय या भूमिकेचा संदर्भ घेत, 'दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन इन्स्पेक्टर विजय. तुमच्या सतत चिरतरुण, उत्साही, प्रेरणादायी आणि नव्या पिढीसाठी आदर्श प्रस्थापित करण्याच्या वृत्तीला आम्ही सलाम करतो', असं ट्विट केलं.
मुंबई पोलिसांचं हे शुभेच्छापर ट्विट बच्चन यांनाही भावलं असणार यात वाद नाही. दरम्यान, एकिकडे आपल्यावर शुभेच्छांचा हा वर्षाव सुरुच असताना खुद्द अमिताभ बच्चन यांनीही सर्वांचेच आभार मानले. आभार मानण्यासाठी शब्दही कमीच पडतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अमिताभ बच्चन हे लवकरच, 'से रा नरसिंहा रेड्डी' या चित्रपटातून झळकणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीसुद्धा झळकणार आहे. त्याशिवाय ते 'ब्रह्मास्त्र', 'गुलाबो सिताबो', 'झुंड' या चित्रपटांच्याही तयारीला लागले आहेत.