मुंबई : 'काश्मीर प्रश्नावर तोडगा निघण्यास सुरुवात झाली आहे', असं म्हणत जम्मू- काश्मीरमधील सद्यस्थितीवर अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला असणाऱ्यी सैन्यदलाची गस्त आणि पर्यटकांना संबंधित ठिकाणहून परतीची वाट धरण्यास सांगण्यात आल्याच्या मुद्द्यावर त्यांनी आपलं मत मांडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी जम्मू- काश्मीर प्रशासनाकडून अमरनाथ धाम यात्रा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या परिसरातील पर्यटकांना तेथून माघार घेण्यासही सांगण्यात आलं. पाकिस्तानी सैन्यदलाचा पाठिंबा मिळवत काही दहशतवादी संघटना या ठिकाणी हल्ले करणार असल्याच्या शक्यतेमुळे सावधिगिरी बाळगत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. 


दरम्यान, जम्मू- काश्मीर मुद्द्यावर खुद्द काश्मीरी पंडित असणाऱ्या अभिनेते अनुपम खेर यांनी कायमच त्यांची ठाम भूमिका मांडली आहे. शिवाय मोदी सरकारच्या निर्णयांचंही त्यांनी वेळोवेळी समर्थन केलं आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील सद्यस्थितीवर त्यांनी दिलेली ही प्रतिक्रियाही तितकीच महत्त्वाची ठरत आहे. 


कलम ३५ A संदर्भातील घडामोडींविषयी पुढे येऊन मत मांडणाऱ्या खेर यांनी यापूर्वीही कलम ३७० अंतर्गत जम्मू- काश्मीरवासियांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत, ते कलम रद्द करण्यात येण्याविषयी मतप्रदर्शन केलं होतं. असं केल्यासच काश्मीर खोऱ्यातील काही महत्त्वाचे प्रश्न निकाली निघतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता. 



सध्याच्या घडीला साऱ्या देशाचं लक्ष जम्मू- काश्मीरमधील घडामोडींवर लागलेलं आहे. सरकारकडून जम्मू आणि श्रीनगर येथील मोबाईल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तर, जम्मू, रेसी, डोडा, कठुआ आणि उधमपूर भागात असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणआऱ्या विद्यार्थ्यांनाही वसतीगृहातच थांबण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे एकंदरच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रय़त्न करण्यात आलेला असला तरीही तणावाचं वातावरण कायम आहे.