मुंबई : अभिनेता शाहिद कपूर याच्या कारकिर्दीला कलाटणी देणाऱ्या चित्रपटांमध्ये 'कबीर सिंग' या चित्रपटाचं नाव अग्रस्थानी येतं. अशा या चित्रपटासाठी शाहिदच्या चेहऱ्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाच, आता या भूमिकेसाठी कोणा दुसऱ्याच बी- टाऊन अभिनेत्याला विचारण्यात आलेलं ही बाब समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट निर्मात्यांनी कबीर सिंगसाठीच्या मध्यवर्ती भूमिकेकरता आपल्या नावाला पसंती दिली होती. पण, काही कारणास्तव तसं होऊ शकलं नाही असं सांगणारा तो अभिनेता आहे अर्जुन कपूर. 


'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार एका कार्यक्रमात अर्जुनने याविषयी वक्तव्य केलं. ज्यावेळी निर्मात्यांनी चित्रपटाचे स्वामित्व हक्क विकत घेतले तेव्हा मुख्य भूमिकेसाठी अर्जुनचंच नाव विचारात होतं. पण, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने मात्र यापूर्वीच या भूमिकेसाठी शाहिद कपूरची निवड केली होती. 


'ही सर्व प्रक्रिया त्या स्तरावर पोहोचलीच नव्हती, जेव्हा मी निवड करेन किंवा चित्रपट सोडेन', असं म्हणत दिग्दर्शकांनी शाहिदचा एक चित्रपट पाहिल्यामुळे आणि त्याच्याशी याविषयी चर्चा केल्यामुळे त्यांनी शाहिदची निवड केल्याचं अर्जुनने स्पष्ट केलं. एका दिग्दर्शकाच्या निर्णायाचा आपण आदर करत असल्याचंही तो म्हणाला. 


एकिकडे चित्रपट आणि दुसरीकडे प्रेमप्रकरण यांमुळे चर्चेत असणारा अर्जुन त्याच्या खासगी आणि व्यायसायिक आयुष्यात सुरेख समतोल राखत आहेत. येत्या काळात तो 'पानिपत' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.