PHOTO : पत्नीसाठी आयुषमानची भावनिक पोस्ट
त्यांची लढाऊ वृत्ती ही दाद देण्याजोगी ठरत आहे.
मुंबई : अभिनेता आयुषमान खुराना हा एक कलाकार म्हणून जितका संपन्न आहे, तितकाच तो एक जबाबदार पती आणि पिता म्हणूनही आपली भूमिका सुरेखपणे निभावत आहे. आयुषमान हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरतो. तो आणि त्याची पत्नी ताहिरा हे नेहमीच अनेकांना 'कपल गोल्स' देत असतात. मुख्य म्हणजे गेल्या काही काळापासून या दोघांच्याही नात्यात आलेल्या एका वादळानंतरही त्यांची लढाऊ वृत्ती ही दाद देण्याजोगी ठरत आहे.
आयुषमानच्या पत्नीला काही महिन्यांपूर्वीच पहिल्या स्तरातील कर्करोगाचं निदान झालं. त्या क्षणापासूनच ताहिराच्या लढाऊ वृत्तीला आरपली ताकद करत आयुषमानने महत्त्वाची भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं. नुकताच ताहिराचा वाढदिवस पार पडला. त्यावेळी आयुषमानने तिच्यासाठी एक सुरेख पोस्ट लिहित या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये ताहिराचा वेगळा लूक समोर येत आहे. ज्यामध्ये तिने केस कापल्याचं दिसत असून, केमोथेरेपी सुरु असल्यामुळेच ताहिराने उपचारादरम्यानही हा स्टायलिश लूक ठेवल्याचं स्पष्ट होत आहे.
'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... अशीच प्रेरणा देत रहा', असं कॅप्शन देत आयुषमानने ताहिरासाठी एक भावनिक संदेश दिला. ज्यानंतर कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही काळापासून ताहिरा कॅन्सरशी लढा देत असून, तिच्यावर उपचारही सुरु आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत आपल्या प्रकृतीविषयी सर्वांना माहितीही देत असते.