मुंबई : बॉलिवूडमध्ये सलग सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता आयुष्मान खुराना म्हणजे प्रत्येक तरुणीच्या गळ्यातील ताईत ठरत आहे. मित्र, भाऊ, पती, पिता आणि एक अभिनेता अशा विविध भूमिकांमध्ये त्याने प्रत्येकवेळी स्वत:चा असणारा हातखंड सिद्ध केला आहे. आयुष्मानने आतापर्यंत साकारलेली प्रत्येक भूमिका ही चर्चेचा विषय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठरण्यासोबतच बरंच काही सांगूनही गेली. असा हा अभिनेता कितीही मोठा झाला, यशाच्या शिखरावर कितीही उंचापर्यंत पोहोचला तरीही एका व्यक्तीसाठी मात्र तो कायमच लहान राहणार आहे. ज्या व्यक्तीला सतत त्याची काळजीही वाटत राहणार आहे. ती व्यक्ती म्हणजे आयुष्मानची आई. 


अचानकच आयुष्मानच्या आईविषयी सांगण्याचं कारण ठरत आहे ते म्हणजे त्याने पोस्ट केलेला एक फोटो. सोशल मीडियावर नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये आयुष्मान वेट हेअर लूकमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये चंदेरी रंगाचा त्याचा कोट या लूकला आणखी उठावदार करुन जात आहे. आयुष्मानने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्या लूकसोबतच लक्ष वेधत आहे ते म्हणजे त्याने लिहिलेलं अफलातून कॅप्शन. ''थंडीमध्ये केस ओले ठेवल्यामुळे आजारी पडशील. असं आई माझ्या बालपणी नेहमी म्हणायची,  जेव्हा मी चंदीगढमध्ये राहायचो. ती आताही हेच म्हणाली जेव्हा तिने माझा हा फोटो पाहिला. मी तिला म्हटलं..... 'आई', अगं मुंबईत थंडीच पडत नाही.''


आयुष्मानचं हे भन्नाट कॅप्शन पाहिलं असता, 'माँ, माँ होती है....' हेच सिद्ध होत आहे आणि मुळात असं म्हणायला हरकत नाही. त्याचं हे कॅप्शन वाचून कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. 




आयुष्मान खुराना सध्याच्या घडीला त्याच्या करिअरमधील सर्वाधिक चांगल्या टप्प्यावर असल्याचं कळत आहे. 'बधाई हो', 'अंधाधुन', 'आर्टिकल १५', 'बाला' आणि 'ड्रिम गर्ल' अशा अफलातून चित्रपटांच्या माध्यमातून त्याने उल्लेखनीय यश संपादन करत मुख्य प्रवाहात असणाऱ्या सर्वच अभिनेत्यांपुढे तगडं आव्हान ठेवलं. मुख्य म्हणजे निव्वळ चॉकलेट बॉय ही ओळख निर्माण करण्याच्या मागे न धावता कायमच काही सरळ-सोप्या तरीही तितक्याच प्रभावी भूमिकांकडे आयुष्मानचा कल पाहायला मिळाला. एका अर्थी याचाच त्याला वेळोवेळी फायदाही झाला. येत्या काळात आयुष्मान बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुलाबो- सिताबो' या चित्रपटातून झळकणार आहे. त्यामुळे हीसुद्धा चाहत्यांसाठी एक परवणीच असणार आहे.