कपिल शर्माच्या जीवनात `ती` येताच....
खुद्द कपिलनेच दिली याविषयीची माहिती
मुंबई : कारकिर्दीच्या अतिशय महत्त्वाच्या वळणावर आल्यानंतर विनोदवीर कपिल शर्मा यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली होती. काही आव्हानं पार केल्यानंतर आणि कठिण प्रसंगांना सामोरं केल्यानंतर कपिलने गिन्नी छतरथ हिच्याशी लग्नगाठ बांधली होती.
सहजीवनाच्या या प्रवासात कपिलला गिन्नीची साथ मिळाली आणि पुन्हा एकदा त्याच्या जीवनाची गाडी रुळावर आली. या साऱ्या घडामोडींमध्ये कपिलच्या जीवनात आनंदाची बरसातही होत होती. गिन्नीच्या येण्याने जितकी सकारात्मकता त्याला आणखी चांगला व्यक्ती होण्यासाठी प्रवृत्त करुन गेली तितकीच किंबहुना त्याहूनही द्विगुणित सकारात्मकता आणि आनंद तो सध्याच्या घडीला अनुभवत आहे. याला निमित्त ठरत आहे ती म्हणजे कपिलच्या जीवनात नव्याने प्रवेश घेणारी 'ती'...
अरेच्चा! ही तर हुबेहूब मधुबाला....
कपिल आणि गिन्नीचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे, कारण या सेलिब्रिटी जोडीच्या जीवनात एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. खुद्द कपिलनेच ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती देत आपल्या आणि गिन्नीच्या जीवनात एक कन्यारत्न आल्याचं जाहीर केलं. 'तिला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे.... जय माता दी', अशा शब्दांत त्याने एक ट्विट केलं.
कपिलने ही गोड बातमी जाहीर करताच सोशल मीडियावर त्याला अनेकांनीच शुभेच्छा देण्यात सुरुवात केली. चाहते म्हणू नका किंवा मग कलावर्तुळातील काही मित्रमंडळी, प्रत्येकानेच कपिलला या खास क्षणी शुभेच्छा देत त्याच्या लाडक्या लेकीचं स्वागत केलं. दरम्यान, तिचं नाव काय असेल, कपिल तिच्याविषयी आणखी काय बोलणार याचीच चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे आता त्याच्या सोशल मीडिया पोस्टकडेही अनेकांचं लक्ष असेल हे नाकाराता येत नाही.