मुंबई : हिंदी कलाविश्वासोबतच साऱ्या विश्वाती अभिनेत्यांच्या यादीत, विशेषत: रुपवान अभिनेत्यांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेता हृतिक रोशनचं. 'कहो ना प्यार है' मधील हृतिक असो किंवा मग 'झिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटातील हृतिक असो. त्याचं प्रत्येक रुप हे चाहत्यांसाठी परवणीच ठरलं. असा हा बी टाऊनचा 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता एकेकाळी अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे त्रस्त होता. ही अडचण दूर करण्यासाठी त्याने दर दिवशी काही तंत्रांचा वापर केला, सतत बोलण्याता सराव केला आणि अखेर या अडचणीवर त्याने मात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१२ या वर्षापर्यंत तो अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे त्रस्त होता. ज्यानंतर याकडे त्याने पुन्हा गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली. किंबहुना आजही अनेकदा हृतिक स्वत:शीच तासन् तास बोलत असतो, जेणेकरुन इतरांशी संवाद साधतेवेळी तो अडखळणार नाही. 'मुंबई मिरर'शी संवाद साधताना त्याने याविषयीची माहिती दिली. 


'मी बोलण्याच्या या वाईट सवयीवर मात करण्यासाठी दर दिवशी प्रयत्न केले. आताही मी कमीत कमी तासभर स्वत:शी बोलण्याचा सराव करतो. म्हणजे इतरांशी संवाद साधताना मला काही अडचणी येणार नाहीत. अडखळथ बोलणाऱ्यांविषयी इतरांचा पाहण्याचा दृष्टीकोन आणि एकंदरच समाजात याकडे ज्या दृष्टीने पाहिलं जातं ती गोष्ट मला फक्त लहानपणीच नव्हे तर, २०१२ या वर्षापर्यंत सतावत होती. अगदी मी एक यशस्वी अभिनेता म्हणून नावारुपास आल्यानंतरही', असं तो म्हणाला. 


'दुबई' या शब्दाचा उच्चार करण्यातही हृतिकला अडचण येत होती. दुबईमध्ये एका पुरस्काराने त्याला सन्मानित केल्यानंतर त्याला आभार मानायचे होते. त्याविषयीच माहिती देत, आपण 'दुबई' या शब्दाचा सराव करत नंतरच त्याचा उच्चार स्पष्टपणे करु शकलो असंही हृतिकने स्पष्ट केलं. हृतिकची बहिण सुनैना रोशन हिनेही तिच्या एका ब्लॉगमध्ये हृतिकच्या या अडचणीविषयी लिहिलं होतं. त्याने कशा प्रकारे या सवयीवर मात करत यशस्वी होण्याच्या दिशेने वाटचाल केली, याविषयी तिने लिहिलं होतं. वयाच्या तेराव्या वर्षापासून पुढील जवळपास २२ वर्षे हृतिकने या अडचणीचा सामना केल्याचं तिने यात उघड केलं होतं.