मुंबई : ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक, तसंच अभिनेता हृतिक रोशनचे आजोबा जे. ओम प्रकाश यांचं बुधवारी, म्हणजेच ७ ऑगस्टला निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात एक कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यापार विश्लेषक अक्षय राठी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही दु:खद बातमी सर्वांना दिली. 'ज्येष्ठ आणि दिग्गज चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांचं आज सकाळी निधन झालं. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या प्रसंगी खंबीरपणे उभं राहण्याची ताकद देवो', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं. 


हिंदी चित्रपट जगतात जे. ओमप्रकाश यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. 'आस का पंछी', 'आये दिन बहार के', 'आयी मिलन की बेला', 'आँखों आँखों मे', 'आया सावन झूम के' आणि 'आप की कसम' या चित्रपटांसाठी ते ओळखले जात होते. 



हृतिकसोबतही त्यांचं खास असं नातं होतं. 'सुपर ३०' या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या वेळी त्याने आजोबांसोबतचा एक फोटो पोस्ट करत त्यांचा उल्लेख 'सुपर टीचर' म्हणून केला होता. '#MySuperTeacher... माझे आजोबा. ज्यांना मी प्रेमाने देदा म्हणायचो. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मला जी शिकवण दिली ती मी आज माझ्या मुलांपर्यंत पोहोचवत आहे', असं तो म्हणाला होता.