निधनाची बातमी कळताच जॅकी श्रॉफ यांनी गाठलं कामगाराचं घर; हीच ती मनाची श्रीमंती
रुपेरी पडद्यावरचा हा `भिडू` पाहता पाहता कधी खराखुरा भिडू झाला हे कळलंही नाही.
मावळ : अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी कायमच प्रेक्षकांपुढे त्यांच्यातील अभिनेत्यासोबतच मोठ्या मनाचा माणूसही सादर केला. त्यांनी हा माणूस सादर केला नाही, तर नकळत त्यांच्या कृतींतून तो सातत्यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत गेला. (Jackie Shroff Bollywood)
रुपेरी पडद्यावरचा हा 'भिडू' पाहता पाहता कधी खराखुरा भिडू झाला हे कळलंही नाही. आता पुन्हा एकदा जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे.
अनेकदा असं म्हटलं जातं रक्ताच्या नात्याहून मनानं जोडलेली नाती संकटाच्या वेळी आधार देतात. अशाच एका नात्यापोटी जॅकी दांनी थेट मावळ गाठलं.
मावळच्या चांदखेड इशं त्यांचं एक फार्महाऊस आहे. तिथे काम करणाऱ्या एका सागर दिलीप गाडकवाड नावाच्या कर्मचाऱ्याच्या वडिलांचं निधन झाल्याची बातमी श्रॉफ यांच्या कानावर आली.
त्यांनी लगेचच चांदखेड रोखानं प्रवास केला आणि या कामगाराच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं, त्यांना आधार दिला.
गाडकवाड, या कामगाच्या घरी जात त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधला आणि हा या कुटुंबाला मिळालेला सर्वात मोठा दिलासा ठरला.
सागरच्या कुटुंबातील सानथोरांच्या शेजारी बसून जॅकी दांनी त्यांना आधार दिला. गेलेल्या माणसाची सल त्यांना भरून काढता आली नाही, पण त्यांच्या येण्यानं या कुटुंबाचा कोलमडलेला डोलारा सावरण्यास नक्कीच मदत झाली असणार यात हरकत नाही.
हे असं काहीतरी करण्याची जॅकी श्रॉफ यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा त्यांच्या कृतींनी पाहणाऱ्यांपुढे आदर्श प्रस्थापित केल्याचं पाहायला मिळालं आहे.
एक कलाकार संपत्तीनं श्रीमंत असतोच. पण, मनाची श्रीमंती नेमकी काय असते हे दाखवून देणारे मात्र कमी असतात. जॅकी दा यांपैकीच एक, नाही का?