मुंबई : स्वप्ननगरी मुंबईत आलेल्या प्रत्येकासाठी या शहरात स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करणं अतीव महत्त्वाचं असतं. त्याशिवाय आणखी एक बाबसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. ती म्हणजे या शहरात स्वत:चं घर असण्याची. हिंदी चित्रपटसृष्टीतील नवोदित कलाकारांपैकी एक असणाऱ्या अभिनेता कार्तिक आर्य़न याचीसुद्धा अशीच इच्छा होती. मुख्य म्हणजे त्याने ती पूर्ण ही केली. तेसुद्धा खास अंदाजात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हर घर कुछ कहता है....' असं कायम म्हटलं जातं. घर म्हणजे फक्त चार भिंतींची एक खोली नसून, त्यामध्येही भावनांचा वावर असतो. हीच बाब हेरत कार्तिकने मुंबईतील वर्सोवा भागात एका घराची खरेदी केली आहे. कार्तिकचं हे घर त्याच्यासाठी अतिशय खास आहे. कारण, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथून ज्यावेळी तो मुंबईत आला होता, तेव्हा याच घराने त्याला आसरा दिला होता. या घरात तो भाड्याने म्हणजेच 'पेइंग गेस्ट' म्हणून राहात होता. 


सध्याच्या घडीला आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असणारा हा अभिनेता कामासोबतच त्याच्या खासगी आयुष्यालाही तितकंच महत्त्वं देत आहे. दरम्यान, ज्या घराची त्याने खरेदी केली तेथे सुरुवातीच्या काळात कार्तिकसोबत इतर मुलंही राहात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घरासाठी कार्तिकने १.६० कोटी रुपयांची किंमत मोजली आहे. पाचव्या मजल्यावर असणारा हा फ्लॅट ५५१ चौरस फुटांचा आहे. कार्तिककडून या विषयीची अधिकृत माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही. पण, त्याच्यासाठी हे घर बरंच महत्त्वाचं असेल यात दुमत नाही. 



गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी मायानगरी मुंबईत नवी घरं खरेदी केली. यामध्ये अभिनेत्री तमन्ना भाटीया, आलिया भट्ट, विवेक ओबेरॉय यांच्या नावांचा समावेश आहे.