मुंबई : 'केदारनाथ' या चित्रपटातून साधारण वर्षभरापूर्वी बॉलिवूडमध्ये अधिकृतरित्या पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वेळातच तिची वेगळी ओळख निर्माण केली. कमी कालावधीतच तिला येणारे चित्रपटांचे प्रस्ताव, लोकप्रियता या साऱ्याला तिने अगदी शिताफीने हाताळलं. अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा ही खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साराचं खासगी आयुष्य चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे 'सोनू के टिटू की स्वीटी'फेम अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबतचं तिचं बहुचर्चित प्रेमप्रकरण. सारा आणि कार्तिक हे रिलेशनशिमध्ये असल्याच्या चर्चांना मध्यंतरी उधाण आलं होतं. पण, काही महिन्यांतच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचंही म्हटलं गेलं. 


साराच्या वाढदिवसासाठी तिला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून कार्तिकने थेट बँकॉक गाठलं होतं. पण, त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साराची एकही पोस्ट नव्हती. इतकच नव्हे तर, कामाची कारणं वगळताही त्यांच्या भेटीगाठी कमीच झाल्या होत्या. ज्यामुळे त्यांच्या नात्यात खरंच दुरावा आला असावा अशा चर्चांनी जोर धरला. पण, नुकत्याच मुंबईत पार पड़लेल्या स्टार स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात मात्र त्यांच्या नात्यात सारंकाही आलबेल असल्याचं स्पष्ट होत आहे. 



शाहिद कपूर आणि कार्तिकने या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतली होती. याचदरम्यान काही सेलिब्रिटींचा वेगळा आणि धमाल अंदाज सोशल मीडियावर आता चांगलाच गाजत आहे. याचीच प्रचिती एका व्हायरल व्हिडिओतूनही येत आहे. ज्यामध्ये सारा एका पायात उंच टाचांची सँडल घालून दिसत आहे. तर, तिच्या दुसऱ्या पायात मात्र सँडल नाही. असं चालत असतानाच साराचा तोल गेला, तोल जाऊन ती पडणार इतक्य़ातच कार्तिक तिच्या मदतीला धावला आणि त्याने तिला लगेचच सावरलं. 



साराप्रती कार्तिकचा हा अंदाज आणि एकंदरच या दोघांचा एकमेकांसोबत वावरतानाचा सहजपणा पाहता, दुराव्याचा लवलेशही त्यांच्या नात्यात दिसत नसल्याची प्रतिक्रिया काही चाहत्यांनी दिली आहे. दरम्यान, ही बहुचर्चित जोडी येत्या काळात इम्तियाज अली दिग्दर्शित 'आज कल' चित्रपटातून स्क्रीन शेअर करणार आहे. १४ फेब्रुवारी २०२०ला त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.