मुंबई : मॉडेलिंग आणि अभिनय विश्वात आपल्या अनोख्या आणि तितक्याच प्रभावी अंदाजात चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या मिलिंद सोमणचं नाव घेतलं की, लगेचच त्याची प्रतिमा डोळ्यांपुढे उभी राहते. रुबाबदार, उंच, रुपवान असा मिलिंद म्हणजे अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत. अशा या अभिनेत्याला दिलखुलासपणे नाचताना कधी पाहिलं आहे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवणींच्या वाटेवर मागे जाऊन पाहिलं तर असे फार कमी प्रसंग आठवतील. पण, तसं करण्याचीही गरज नाही. कारण खुद्द मिलिंदनेच त्याचा एक सुरेख असा व्हिड़िओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो, पत्नी अंकिता कोनवार हिच्यासोबत ठेका धरताना दिसत आहे. अंकिताप्रमाणेच हावभाव आणि हातवारे करत मिलिंद 'बिहू' हा नृत्यप्रकार सादर करताना दिसत आहे. 


गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात या दोघांचा हा सुरेख अंदाज पाहायला मिळाला. यावेळी अंकिताने पारंपरिक आसामी पद्धतीची साड़ी नेसली होती. तर, मिलिंद हा त्याच्या नेहमीच्याच दमदार अंदाजात पाहायला मिळाला. सोशल मीडियावर या 'पॉवर कपल'चा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. 



कोणी या जोडीची प्रशंसा केली, तर कोणी मिलिंदच्या नृत्यकौशल्याला दाद दिली. कायमच शारीरिक सुदृढता, आरोग्यदायी सवयी, सकस आहार या सर्व गोष्टींना महत्त्व देणारा मिलिंद एका अर्थी आनंददायी जीवनाच्या वाटेवर येण्यासाठीच चाहत्यांना प्रोत्साहित करत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 


मिलिंद आणि अंकिताने कायमच नव्या जोड्यांपुढे आदर्श प्रस्थापित केला आहे. प्रेमाच्या बळावर वयाचं अंतर न जुमानता ही जोडी एकमेकांना साथ देत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघंही कायमच काही अफलातून आणि लक्षवेधी पोस्ट करताना दिसतात.