मुंबई : अभिनेता Milind Soman  मिलिंद सोमण हा कायमच त्याच्या अनोख्या अंदाजासाठी आणि एव्हरग्रीन चार्मसाठी ओळखला जातो. मॉडेलिंग, अभिनय आणि फिटनेस अशा सर्वच क्षेत्रांमध्ये मिलिंद अगदी सराईताप्रमाणे वावरतो. कित्येकदा तर तो सर्वांपुढे शारीरिक सुदृढतेचा आदर्श प्रस्थापित करतो. अशा या सेलिब्रिटीची आईसुद्धा त्याच्याचप्रमाणं सोशल मीडिया गाजवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता या दोघांनीही उषा सोमण यांचे पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडिओ पाहता, वाह क्या बात! अशीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्यावाचून तुम्हीही स्वत:ला थांबवू शकणार नाही आहात.


कोरोना व्हायरस, लॉकडाऊनच्या या काळात मिलिंदही त्याच्या कुटुंबासमवेतच अधिकाधिक वेळ व्यतीत करत आहे. यादरम्यानच नुकताच त्याच्या आईचा वाढदिवस पार पडला. ८१ वा वाढदिवस साजरा करत त्याच्या आईनं सर्वांनाच थक्क केलं. कसं, ते एकदा हा व्हिडिओ पाहून आणि त्याचं कॅप्शन वाचून पाहाच. 



उषा सोमण यांचा उत्साह या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेच. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी १५ पुशअप्स मारल्या. इतकंच नव्हे, तर आरोग्यदायी खाण्यालाच प्राधान्य देणाऱ्या या सुपरमॉमनं या खास दिवशी सुनेनं म्हणजेच अंकिता कोनवार हिनं बनवलेल्या जॅगरी व्हॅनिला आलमंड केकचाही आस्वाद घेतला. 


खुद्द अंकितानंही आपल्या या अफलातून सासूबाईंना शुभेच्छा देत कॅप्शनमध्ये त्यांच्या कमाल व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिलं, '८१ फिट आणि फॅब्युलस! मागच्या वर्षी म्हणजेच ८० व्या वाढदिवशी त्यांनी बाली येथे स्कूबा डायव्हिंगसाठी जाण्याचं ठरवलं होतं. यंदा त्या बंजी जंपिंगसाठी झांबियाला जाणार होत्या. पण, जगभरातील सद्यस्थिती पाहता त्यांना असं करता आलं नाही.  पण, आम्ही तरीही घरीच त्यांचा वाढदिवस साजरा करुन अतिशय आनंदात आहोत आणि या क्षणांसाठी फार आभारी आहोत'.



अतिशय अनोख्या अंदाजात पण, तरीही तितक्याच साधेपणानं मिलिंद सोमणनं त्याच्या पत्नीसह आईचा वाढदिवस तितक्याच उत्साहात साजरा केला. सोशल मीडियावर त्याच्या या सुपरमॉमच्या उत्साहाला सर्वांनी दाद तर दिलीच, पण त्यांच्याकडून बरंच काही शिकत त्यांचे आभारही मानले.