मुंबई: 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने एका मुलाखतीदरम्यान केला होता. ज्यानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तनुश्रीच्या वादानंतर याविषयीच्या बऱ्या चर्चांनाही वाचा फुटली. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोतबत घडलेल्या काही गैरवर्तणूकीच्या प्रसंगाविषयीसुद्धा अगदी खुलेपणाने वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. 


मुख्य म्हणजे तनुश्रीने लावलेले सर्व आरोप हे खोटे असल्याचं सांगत नाना पाटेकर आणि सदर चित्रपटाच्या निर्माते- दिग्दर्शकांनीही तिला कायदेशीर नोटीस बजावली.


महिला आयोग, सहकलाकार आणि इतरही बऱ्याचजणांनी तनुश्रीच्या बाजूने उभं राहत तिला आधार दिला. याविषयी चर्चा शमण्याचं नाव घेत नाहीत तोच आता आणखी एक खळबळजनक खुलासा सर्वांसमोर आला आहे. 


तनुश्रीला नानांनी त्या दिवशी दुपारी बारा वाजता व्हॅनिटी वॅनमध्ये बोलावलं होतं, असा खुलासा रामदास बोर्डे नावाच्या स्पॉटबॉयने केला असं वृत्त लोकमतने प्रसिद्ध केलं आहे. 


रामदास यांच्या वक्तव्यानुसार त्या दिवशी सेटवर नानांनी आपल्याला व्हॅनिटीमध्ये बोलावलं. तेथून बाहेर येताच ती मोठ्या रागारागाने गणेश आचार्य यांच्याकडे गेली. तिने याविषयी तक्रारही केली. त्यावेळी आचार्य यांनी उलट तनुश्रीचीच समजूत काढण्याचा प्रयत्न केला, असं सांगत तनुश्री त्यावेळी इंग्रजीतच भांडत होती असा खुलासा त्यांनी केला. 


नाना पाटेकर हे एक मोठं प्रस्थं असून, तुझ्या करिअरवर या साऱ्याचा परिणाम होईल, असंच तिला अनेकजण सांगत होते. सेटवर ती आपली बाजू ओरडून ओरडून सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण, तिचं कोणीच ऐकलं नाही. हे पाहून अखेर ती तिथून निघून गेली. 


त्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर नानाही काही वेळाने व्हॅनिटीतून काहीच झालं नाही, असं समजत बाहेर आले. त्यावेळी सर्वच स्पॉटबॉयना त्यांच्या नोकरीची चिंता असल्यामुळे कोणीच काही बोललं नाही, असंही त्यांनी इथे नमूद केलं.


राखी सावंतचं वक्तव्य खोटं...


राखी सावंत हिने तनुश्रीविषयी केलेले सर्व आरोप हे खोटे असल्याचं सांगत जर त्या दिवशी तनुश्रीने अंमली पदार्थांचं सेवन केलं असतं, तर ती गाण्याच्या चित्रीकरणालाच येऊ शकली नसती. स्वत:राखीसुद्धा त्यानंतर सेटवर आली नव्हती. कारण त्यानंतर दोन दिवस चित्रीकरणच झालं नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.  इतकच नव्हे तर त्यांनी याविषयी न्यायालयात साक्ष देण्याची तयारीही दाखवली आहे.