#MeToo आरोप प्रकरणी नाना पाटेकर यांना मोठा दिलासा
..... या प्रकरणीचा अंतिम निर्णय
मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अबिनेत्री तनुश्री दत्ता हिने नानांवर गैरवर्तणुकीचे आरोप लावले होते. पण, या प्रकरणात कोणताही पुरावा नसल्याची बाब पुढे आली आहे. परिणामी या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा अहवाल पोलिसांनी अंधेरी न्यायालयात सादर केला आहे.
न्यायालयाकडून पोलिसांतर्फे सादर करण्यात आलेल्या या अहवालाची तपासणी होऊन त्यानंतर या प्रकरणीचा अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. तुर्तास नाना पाटेकर यांना #MeToo आरोप प्रकरणातून मोठा दिलासा मिळाला आहे.
या अहवालात नेमकं काय नमूद करण्यात आलं आहे?
सध्याच्या घडीला न्यायालयात जो अहवाल सादर करण्यात आला आहे त्याला बी समरी असं म्हटलं जातं. एकूण ए, बी आणि सी अशा तीन समरी असतात.
एसमरी म्हणजे संबंधित प्रकरणीचा पुरावा नाही, बी समरी म्हणजे खोटा खटला आणि सी समरीमध्ये एखाद्यावर चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याविषयीचा चपशील असतो. या समरी पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात येतात.
तनुश्री आणि नानांच्या या प्रकरणात पोलिसांनी बी समरी दाखल केली आहे. ज्यामध्ये पुराव्याअभावी एक खोटा खटला दाखल केल्याचं या अहवालात म्हटलं गेलं आहे.
काय असेल पुढील प्रक्रिया ?
हा अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाकडून तनुश्रीला एक संधी देण्यात येणार आहे. ज्यावर तिचंही मत विचारात घेतलं जाणार आहे. ज्यानंतर पुढील निर्णय देण्यात येईल. मुख्य म्हणजे न्यायालयाकडून आदेश मिळाले तर, याप्रकरणीचा तपास पुन्हाही केला जाऊ शकतो. पण, सध्याच्या घडीला नानांविरोधात कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे नानांचा हा एक दिलासाच मिळाला आहे.