पाटणा : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं काही दिवसांपूर्वीच त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या निधनानं सारं कलाविश्व हेलावून गेलं. त्यानंतर सुरु असणाऱ्या चर्चा, आरोप प्रत्यारोपांची सत्र या साऱ्यापासून दूर सुशांतचे कुटुंबीय मात्र अजूनही त्याच्या निधनाच्या दु:खातून सावरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांची भेट घेत आधार देण्यासाठी म्हणून खुद्द नाना पाटेकर यांनी सुशांतचं घर गाठलं. कलाकार मंडळींनी सोशल मीडियापुरताच सीमीत राहत सुशांतच्या जाण्याविषयी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली असतानाच नानांनी मात्र त्यांची वाट थेट सुशांतच्या घराकडेच वळवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाटणा येथे सुशांतच्या घरी जात जी परिस्थिती उदभवली त्याबाबत नानांनी दु:ख व्यक्त केलं. सुशांतच्या वडिलांना, त्याच्या कुटुंबीयांना धीर दिला. सुशांत एक अतिशय चांगला आणि उत्तम अभिनय सादर करणारा अभिनेता होता. तो आता या जगात नाही, यावर आपला विश्वासच नसल्याची भावना नानांनी व्यक्त केली. 


सुशांत आपल्यामध्ये नसल्याचं दु:ख आपण अद्यापही पचवू शकलो नसून, मी माझाच मुलगा गमावल्यासारखं वाटत आहे, असं म्हणत नानाही भावूक झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुशांतसारखी मुलं फार कमी असतात. तो फारच लहान होता. यापुढंही तोआणखी ३० वर्षे काम करु शकत होता या शब्दांत त्यांनी त्याच्या नसण्याची भावना व्यक्त केली. 


 


नानांनी मोठ्या आपुलकीनं सुशांतच्या कुटुंबाची घेतलेली भेट त्यांना सहाजिकच काही प्रमाणात धीर देऊन गेली. असं असलं तरीही आपल्या मुलाच्या अचानक जाण्याचं खचलेल्या त्याच्या वडिलांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी आणखी वेळ जाणार हे मात्र नाकारता येणार नाही.