मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वादाला दर दिवशी नवं वळण मिळत आहे. आरोप, प्रत्यारोप, पाठिंबा, समर्थन, नाराजी, दुजोरा या सर्व गोष्टी पाहता आता कलाविश्वातही नाना पाटेकर यांची साथ देणारे आणि तनुश्रीचं म्हणणं मानणारे असे दोन गट पाहायला मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. 


काही दिवसांपूर्वीच देण्यात आलेल्या एका मुलाखतीत तिने याविषयीचा खुलासा केला. ज्यानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 


नानांच्या आयुष्यावरही या साऱ्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री क्रिती सनॉन, पूजा हेगडे यांच्यासमवेत नाना जैसलमेर येथे 'हाऊसफुल्ल ४' या चित्रपचटाच्या चित्रीकरणासाठी पोहोचले. 


किंबहुना हे आरोपांचं वृत्त चर्चेत येण्यापूर्वीही नृत्यदिग्दर्शिका फराह खान हिने एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये नानाही दिसत होते. पण, त्यानंतर मात्र नाना चित्रपटाच्या सेटवर येणं टाळत असल्याचंही कळत होतं.


सुरु असणारं प्रकरण पाहताच नानांनी सेटवर येणं टाळल्याचंही म्हटलं गेलं. 


अखेर आणखी चर्चा होण्यापूर्वी नानांनी सेटवर येत चित्रीकरणास पुन्हा सुरुवात केल्याचं वृत्त सुत्रांनी दिलं आहे. 


सोमवारी नाना पुन्हा सेटवर आले. त्यांनी चित्रीकरणासही सुरुवात कली. पण, यावेळी सेटवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. इतकच नव्हे तर, तेथील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. 


चित्रपटातील सहभागी कलाकारांव्यतिरिक्त इतर कोणालाही सेटवर मोबाईल फोन आणण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. 


नाना चित्रीकरणावर परतले हे खरं  पण, आता ते या सर्व प्रकरणावर खुलेपणाने आपलं मत कधी मांडतात आणि पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणतात याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.