मुंबई :  अभिनेता प्रतीक बब्बर यानं काही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण, ज्या चित्रपटांतून तो झळकला त्यामध्ये त्यानं आपली छाप सोडली हे मात्र नाकारता येणार नाही. त्यानं साकारलेली प्रत्येक भूमिका किंबहुना त्याहूनही प्रतीकचं व्यक्तीमत्त्वं सर्वांचंच लक्ष वेधणारं ठरत होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतीकनं कायमच त्याची वेगळी भूमिका मांडली. मग ते सोशल मीडिया पोस्ट करणं असो, आपली जोडीदार निवडणं असो किंवा मग आणखी काही. 


बोल्ड स्टेटमेंट आणि बोल्ड निवडींसाठीही या अभिनेत्रानं नजरा वळवल्या. आता म्हणे याच प्रतीकनं इंटिमेट सीन आणि त्यासाठी आपली जोडीदाराची परवानगी या मुद्द्यावर लक्षवेधी वक्तव्य केलं. 


अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं 'गहराईयां' चित्रपटातील इंटिमेट सीनसाठी रणवीरची अर्थात तिच्या पतीची परवानगी घेतली होती का असा प्रश्न तिला विचारला गेला. त्याच धर्तीवर प्रतीकनंही नुकतंच एका मुलाखतीत त्याचीही भूमिका स्पष्ट केली. 


'मला वाटतं परवानगी घेणं (इंटिमेट दृश्यांसाठी) गरजेचं नाही. माझं मत विचारात घ्याल तर, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आपला जोडीदार काय करतो आहे किंवा करते आहे याबद्दल तुमच्या मनात आदर असायलाच हवा', असं तो म्हणाला. 


प्रत्येक क्षेत्रासाठी हाच नियम लागू असल्याचंही तो म्हणाला. संवाद साधणं हाच मूलमंत्र जपण्याचाही सल्ला त्यानं दिला. कारण, कोणत्याही नात्यात जोडीदारांनी एकाच पायरीवर असणं अतिशय महत्त्वाचं, असं म्हणत परवानगी घेणं मात्र आपल्याला रुचत नसल्याचं तो म्हणाला. 


संतापाच्या भरात प्रतीकनं हे परवानगी प्रकरण वेगळ्याच टप्प्यावर नेत तुम्ही काय माझे आई-वडील आहात का? असा बोचरा सवाल केला. 


कारकिर्द मी माझ्या बळावर उभी केली आहे, मी आजपर्यंत कोणाची परवानगी मागितली नाही आणि तुम्ही असं करणारे कोण, असं विचारत माझ्या जोडीदारानं या प्रकारच्या परवानगीसाठी मला विचारु नये हीच मी अपेक्षा करतो असं प्रतीक म्हणाला. 


परवानगी घ्यायचा मुद्दा आलाच की, नातं सपलंच म्हणून समजा; म्हणत प्रतीकनं नात्यातील पारदर्शकता किती महत्त्वाची आहे हाच मुद्दा अधोरेखित केला.