...म्हणून दीपिका-रणवीरचा विवाहसोहळा अडचणीत
जवळपास चार दिवस चाललेला हा दिमाखदार विवाहसोहळा आता अडचणीत आला आहे.
मुंबई : बॉलिवूड आणि चाहत्यांच्या वर्तुळात सध्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचीच चर्चा सुरु आहे. अनेक स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. परदेशातील चाहत्यांनीही 'दीप-वीर'ला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. पण, त्यांचा जवळपास चार दिवस चाललेला हा दिमाखदार विवाहसोहळा आता अडचणीत आला आहे.
'द ट्रिब्युन'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार इटलीतील एका शीख संघटनेकडून दीपिका-रणवीरच्या आनंद कारजविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
१४ नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीर कोंकणी पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकले. ज्यानंतर १५ नोव्हेंबरला त्यांचा सिंधी, शीख पद्धतीने विवाहसोहळा म्हणजेच आनंद कारज पार पडलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका-रणवीरच्या लग्नासाठी गुरु ग्रंथसाहेब हा धार्मिक ग्रंथ Brescia येथील गुरुद्वारातून १५० किमी अंतरावर असणाऱ्या लेक कोमो येथील व्हिलामध्ये नेण्यात आला होता. ज्या ठिकाणी ही सेलिब्रिटी जोडी विवाहबद्ध झाली. पण, यावर शीख समुदायाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
इटलीतील भारतीय शीख समुदायाचे अध्यक्ष सुखदेव सिंग कांग यांनी आनंद कारजमध्ये अनेक चुका झाल्याचं स्पष्ट केलं.
काय आहे नेमकं प्रकरण ?
अकाल तख्तमध्ये सांगितल्यानुसार आनंद कारजसाठी गुरु ग्रंथसाहेब कोणत्याही हॉटेल, बँक्वेट हॉल अथवा इतर ठिकाणी नेण्यास अनुमती नाही. त्यामुळे हे अकाल तख्तच्या हुकूमनाम्याचं उल्लंघन करत गुरुद्वाऱ्यातून गुरु ग्रंथसाहेब बाहेर नेण्यात आलं, असं कांग म्हणाले.
सदर प्रकरणी इटलीतील शीख समुदायाच्या संघटनेकडून अकाल तख्तशी संबंधितांकडे याविषयीची तक्रार करण्यात आली असून, आता ते या प्रकरणात डोकावणार असल्याचं कळत आहे.
काय आहे आनंद कारज?
शीख समुदायात विवाहबद्ध होण्याच्या प्रथेला आनंद कारज असं म्हणतात.
या प्रकारचा विवाहसोहळा हा गुरुद्वारामध्ये पार पडत असून, वधू आणि वर गुरु ग्रंथसाहेबसमोर बसून आणि त्याभोवती फेरे मारून सहजीवनाची शपथ घेतात.