मुंबई :  ऑनस्क्रीन केमिस्ट्री म्हणू नका किंवा ऑफस्क्रीन केमिस्ट्री. रुपेरी पडद्यापासून ते खासगी आयुष्यापर्यंत कलाकारांच्या वर्तुळात कायमच चर्चेत असणारी एक जोडी म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंगची. चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ही जोडी गेल्या वर्षी म्हणजेच, १४ नोव्हेंबर, २०१८ ला विवाहबंधनात अडकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका आणि रणवीरच्या नात्याची खरी सुरुवात झाली होती ती म्हणजे 'गोलियों की रासलीला राम- लीला' या चित्रपटातून. या जोडीच्या अफलातून केमिस्ट्रीचा प्रत्यय येत आहे तो म्हणजे रणवीरने शेअर केलेल्या एका फोटोतून. 


'रामलीला' या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो रमवीरने शेअर करत, यासाठी कॅप्शनची काय गरज असं लिहित सर्वांसमोर पुन्हा त्या चित्रपटाच्या आठवणी जाग्या केल्या. या फोटोमध्ये रणवीरची नजर काही दीपिकावरुन हटत नसल्याचं पाहायला मिळत आहे. 


मुख्य म्हणजे रणवीरने हा फोटो शेअर करताच त्याची पत्नी म्हणजेच दीपिका यावर लगेचच व्यक्त झाली. 'सात वर्षांमध्ये काहीही बदललेलं नाही....', असं लिहित दीपिकाने तिची खोडकर प्रतिक्रिया दिली. या दोघांमधील सोशल मीडियावरील हे प्रेम पाहून इतरही सेलिब्रिटींनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. 



रणवीर आणि दीपिका लग्नानंतर पहिल्यांदाच '८३`' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटातून क्रिकेट विश्वचषक विजयाचा थरार आणि त्या काळातील प्रसंगांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या चित्रपटातून रणवीर क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर, दीपिका त्याची ऑनस्क्रीन पत्नी साकारणार आहे.