आजारपणाविषयी खुद्द ऋषी कपूर यांचा मोठा खुलासा
मी आशा करतो की....
मुंबई : बऱ्याच दिवसांपासून कलाविश्वापासून दूर असणाऱ्या आणि मायदेशापासूनही दूर असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या आजारपणाविषयी एक मोठा खुलासा केला आहे. २०१८ च्या सप्टेंबर महिन्यापासून ते अमेरिकेत उपचारासाठी गेले आहेत. तेव्हापासूनच त्यांच्या आजारपणाविषयी बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं. अनेकांनीच तर त्यांना कॅन्सरचं निदान झाल्याचंही म्हटलं.
ऋषी कपूर यांचे बंधू, अभिनेते रणधीर कपूर आणि पत्नी नीतू कपूर यांनीही त्यांच्या आजारपणाविषयीची माहिती देत त्यांना कॅन्सर नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण, तरीही आता चर्चा रंगण्याचं प्रमाण काही शमलेलं नाही. याच वातावरणात आता खुद्द ऋषी कपूर यांनीच आपल्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. आपल्यावर सध्याच्या घडीला उपचार सुरू असून, लवकरात लवकर प्रकृती सुधारेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
'माझ्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मी आशा करतो की लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा होऊन मी मायदेशी परतेन. ही सारी प्रक्रिया खूपच वेळखाऊ आणि सहनशीलता, संयमाची परीक्षा पाहणारी आहे आणि माझ्यासाठी हे जरा कठीणच', असं ते म्हणाले. येत्या काळात आपण कोणत्याही आगामी चित्रपटाच्या विचारात नसून मनशांतीला महत्त्व देणार असल्याचं ते 'बॉलिवूड हंगामा'शी संवाद साधताना म्हणाले.
कपूर यांचं हे वक्तव्य पाहता चाहत्यांना दिलासा मिळाला खरा. पण, त्यांच्या आजारपणाविषयी मात्र अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. तेव्हा आता ही एकंदर परिस्थिती पाहता ते कधी एकदा मायदेशी परतणार याकडेच कपूर कुटुंबीय, कलाविश्व आणि चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.