मुंबई : गेल्या काही दिवसांपासून किंबहुना काही महिन्यांपासून Coronavirus कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. एकाएकी या विषाणूचा साऱ्या जगात झपाट्याने प्रसार झाला आणि अनेक देशांमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली. ती इतकी की देशच्या देश ल़ॉकडाऊन करण्याचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रत्येक ठिकाणच्या नागरिकांमध्ये व्हायरच्या भीतीसोबतच एक वेगळ्या प्रकारचं दडपणही आलं. काहींना या दडपणाला नाव देणंही कठीण झालं. पण, या परिस्थितीमध्ये काही व्यक्ती मात्र तितक्याच खंबीरपणे एक प्रभावी नेतृत्त्व म्हणून समोर आल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच काही व्यक्तींमध्ये सध्या नाव घेतलं जात आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं. भारतात कोरोनाचा फैलाव सुरु झाल्याचं लक्षात येताच सर्वच राज्यांमध्ये काही कठोर पावलं उचलण्यात आली. महाराष्ट्रातही आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यशासनातील मंत्रीमंडळाने आणि मित्रपक्षांनी एकजुटीने या परिस्थितीचा सामना करण्याची तयारी दाखवली. तसे निर्णयही घेतले. मुख्यमंत्री म्हणून खुद्द उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी राज्यातील नागरिकांच्या संपर्कात येत त्यांना या कठीण प्रसंगी धीर दिला.


सणवार म्हणू नका किंवा मग ठराविक दिवसांनंतरचा कालावधी प्रत्येक वेळी मुख्यमंत्री नागरिकांशी संवाद साधण्यासाठी येतात आणि कमालीच्या सकारात्मकतेने ते जनतेला या प्रसंगी धीर देऊन जातात. त्यांच्या कार्यकाळातील हा काळ तसा आव्हानाचा. पण, त्यातही त्यांची खंबीर वृत्ती मात्र तितकीच मन जिंकणारी, अशा प्रतिक्रिया अनेकांनीच दिल्या आहेत. यामध्ये आता अभिनेता रितेश देशमुख यानेही आपला सूर मिसळला आहे. 


सध्याच्या घडीला आपण सगळेच एका मोठ्या संकटाचा सामना करत आहोत. या विषाणूव्यतिरिक्त आपण यावेळी भीती, नैराश्य आणि अनिश्चिततेचाही सामना करत आहोत. अशा वेळी आपण आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं पाहिजे. सातत्याने जनतेशी संवाद साधत, काही गोष्टींविषयीचं शंकानिरसन करत ते जनतेच्या संपर्कात आहेत त्याबद्दल त्यांचं कौकुक केलं पाहिजे, असं त्याने ट्विट करत म्हटलं. 



 


मुख्यमंत्र्यांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या रितेशच्या या ट्विटला अनेकांनीच लाईक करत ते रिट्विटही केलं आहे. थोडक्यात सध्याच्या घडीला राज्याच्या नेतृत्त्वाला सर्वांनीच पाठिंबा दिला आहे असं म्हणायला हरकत नाही.