Election results 2019 : कल हाती येताच पंतप्रधान मोदींसाठी रितेशचं लक्षवेधी ट्विट
काही दिवसांपूर्वीच रितेशने पंतप्रधानांवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली होती.
मुंबई : lok sabha results 2019 लोकसभा निवडणुकांच्या निकालांवर सर्वच स्तरांतून लक्ष ठेवण्यात येत आहे. कला, क्रीडा आणि अर्थव्यवस्थेतून या निकालांचा आढावा घेतला जात आहे. निवडणूक निकालांच्या याच पार्श्वभूमीवर सेलिब्रिटी मंडळींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता रितेश देशमुखही मागे राहिलेला नाही. लोकसभा निवडणूक निकालांचे पहिले कल हाती येताच रितेशने थेट पंतप्रधानांना त्यांच्या या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
'लोकशाहीचा उत्सव हा साजरा केला गेलाच पाहिजे हे भारताने, भारतातील जनतेने ठरवलं आहे', असं लिहित रितेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्धान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलचा उल्लेख करत या निकालाच्या शुभेच्छा देत रितेशने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. काही दिवसांपूर्वीच रितेशने पंतप्रधानांवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली होती. पण, त्यानंतर मात्र त्याचं आताचं ट्विट पाहता कला आणि राजकीय विश्वात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मोदींवर टीका करत काय म्हणाला होता, रितेश ?
लातूरमधील एका जाहीर सभेत काँग्रेसच्या वतीने बोलताना देशाला स्वातंत्र्य मिळालं तेच बहुधा काँग्रेसमुळे मिळालं आहे, असं लक्षवेधी वक्तव्य त्याने केलं होतं. 'देश चालवण्यासाठी ५६ इंचाची छाती नव्हे तर, एक हृदय लागतं, चांगलं मन लागतं. ५६ इंचाची छाती म्हणजे केवढी असेल, असा मी विचार करत होतो. ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट असतं, तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही त्याचं मोजमाप करु शकता', अशा शब्दांत रितेश देशमुख याने लातूरमधील सभेत मोदींविरोधात शाब्दीक फटेकबाजी केली होती.