`लाल कप्तान` येतोय तुमच्या भेटीला, पाहा या चेहऱ्यामागे दडलंय तरी कोण ?
`सेक्रेड गेम्स`मधील भूमिकेनंतर त्याच्या वाट्याला आणखी एक दमदार भूमिका
मुंबई : चित्रपट वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे लाल कप्तानची. लाल कप्तान, नावावरुनच काहीतरी वेगळं प्रकरण असल्याचं लक्षात येत आहे. मुळात हे प्रकरण आहेत काहीसं वेगळं. एका प्रभावी आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिकेला प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यासाठी अभिनेता सैफ अली खान आता सज्ज झाला आहे. 'सेक्रेड गेम्स'मध्ये 'सरताज सिंग'ची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याच्या वाट्याला आणखी एक दमदार भूमिका आली असून, प्रेक्षकांमध्येही आतापासूनच त्याविषयीची बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.
'हंटर' अशा नावाची चर्चा असतानाच अखेर सैफच्या आगामी चित्रपटाचा नाव 'लाल कप्तान' असल्याचं जाहीर करत सोशल मीडियावर या चित्रपटाचा फर्स्ट लूक सर्वांच्याच भेटीला आणण्यात आला. ज्यामध्ये सैफ एका नागा साधूच्या रुपात दिसणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहता फार काही अंदाज येत नसला तरीही सैफचा अर्धवट दिसणारा चेहराही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ठरत आहे.
जटाधारी साधू, गडद किनार आणि भेदक नजर असणारे डोळे आणि भस्म लावलेला त्याचा चेहरा असा सैफचा एकंदर लूक पाहायला मिळत आहे. त्याच्या कपाळावर एक टिळाही आहे. पण, जटांच्या वर या टिळ्याची रेष दिसत असून तिथे मात्र ती रक्ताच्या ओघळाप्रमाणे भासत आहे. त्यातच एका व्यक्तीला कोणीतरी खेचत असल्याही पाहायला मिळत आहे. गडद रंगाच्या छटांचा जास्त प्रमाणात वापर करण्यात आलेल्या या फर्स्ट लूकमुळे लाल कप्तानविषयीची उत्सुकता आतापासूनच वाढलेली आहे.
नवदीप सिंग दिग्दर्शित हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'इरॉस इंटरनॅशनल' आणि आनंद एल.राय सादरकर्ते असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती 'कलर यल्लो' या निर्मिती संस्थेकडून करण्यात येत आहे. तेव्हा आता या नागा साधूची कहाणी नेमकी कशी असणार आणि त्यात सैफ प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.