मुंबई : सेलिब्रिटींच्या आयुष्यातील नाती, ही कायमच अनेकांना थक्क करणारी असतात. जितक्या अनपेक्षितपणे ही नाती आकारास आलेली असतात तितक्याच अनपेक्षितपणे या नात्यांमध्ये कधीकधी दुरावाही येतो. असंच एक नातं होतं अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंग यांचं. बऱ्याच वर्षांपूर्वी या दोघांनी घटस्फोट घेत या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण, अमृताविषयी सैफ आजही तितक्याच हक्काने आणि आदराने एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो. असाच एक खुलासा त्याने हल्लीच केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच 'मिड-डे'ला दिलेल्या मुलाखतीतही त्याने अशीच एक बाब सर्वांसमोर ठेवली. सैफ हा एक यशस्वी अभिनेता आणि बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जातो. असा हा अभिनेता आपल्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या अमृतालाही तितकंच श्रेय देतो. 


अमृताने आपल्याला कशा प्रकारे आपल्या कारकिर्दीवर प्रभाव पाडला याविषयी सांगत सैफ म्हणाला होता, ''मीसुद्धा घरातून पळालो होतो, वयाच्या २०व्या वर्षी मी लग्न केलं होतं. या साऱ्यातच मी अमृताला, म्हणजेच माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला श्रेय देऊ इच्छितो. कारण, व्यवसाय आणि अभिनय कारकिर्दीकडे गांभीर्याने पाहण्यासाठी प्रेरित केलं. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही ती हसण्यावारी नेऊच शकत नाही, असं तिने मला सांगितलं होतं. त्याचवेळी मी 'परंपरा' हा चित्रपट केला होता.''



'दिल चाहता है' या चित्रपटात सैफने साकारलेल्या 'समीर' या भूमिकेच्या वेळीसुद्धा अमृताने त्याला मदत केली होती. कारण, सैफला या भूमिकेविषयी काही कल्पनाच येत नव्हती. या भूमिकेसाठी सैफने आमिरचाही सल्ला घेतला होता. पण, तू सर्वांकडे अमूक एका भूमिकेसाठीचे सल्ले का मागत आहेस. ही तुझी भूमिका आहे, जी तू तुझ्याच परिने साकारणं अपेक्षित आहे असं तिने सैफला सांगितलं होतं. सैफची 'दिल चाहता है'मधील भूमिका ही आजही तितकीच लोकप्रिय आहे. अमृता आणि सैफच्या नात्यात दुरावा आला असला तरीही या नात्याप्रती त्या दोघांच्याही मनात असणारा आदर मात्र कमी झालेला नाही. काही गोष्टींसाठी ते कायमच एकमेकांचे ऋणी असल्याचं येथे स्पष्ट होत आहे.