मुंबई : दमदार पार्श्वसंगीत, मध्यवर्ती पात्राची तितकीच दमदार झलक आणि उत्सुकता वाढवणारा असा 'लाल कप्तान' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. नवदीप सिंग दिग्दर्शित 'लाल कप्तान' या चित्रपटामध्ये बी- टाऊनचा 'नवाब', म्हणजेच अभिनेता सैफ अली खान हा, एका नागा साधूच्या रुपात झळकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलरच्या सुरुवातीलाच ही एका शिकाराची गोष्ट असल्याचं स्पष्ट करण्यात येतं. पुढे सैफच्या आवाजातच एक संवाद सुरु असतानाच दुसरीकडे एक आकृती आकारस येताना दिसते. काळ्या, पांढऱ्या आणि लाल रंगांच्या रंगसंगतीतून तयार झालेली ही आकृती पूर्ण झाल्यावर समोर येतो तो म्हणजे लाल कप्तान, रुपातील सैफ. 


'आदमी कै पैदा होते ही, काल अपने भैसे पे चल पढता है.... उसे बापिस लिबाने', म्हणजेच माणून जन्माला येताच काळ, (मृत्यूदेवता यम) रेड्यावर बसून, त्याच माणसाला परत नेण्यासाठी निघतो, असा या ओळींचा अर्थ लागतो. ट्रेलरमध्ये दमदार पार्श्वसंगीताच्या जोडीने जेव्हा हा संवाद कानांवर पडतो, तेव्हा चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज लावता येणं सहज शक्य होतं. 


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या आवाजात पुढे एका पात्राची ओळख करुन दिली जाते. त्याच साथीने सुरु असणारी दृश्य आणि सैफचा अभिनय पाहता ही त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची आव्हानात्मक भूमिका ठरली असणार याचा अंदाज लावणं शक्य होतं. 



चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्य ही अंगावर काटा आणणारी आहेत, तर काही 'लाल कप्तान'विषयी उत्कंठा वाढवणारी आहेत. याला कारणंही तशीच. सैफचा एकंदर लूक पाहता 'पायरट्स ऑफ कॅरेबियन'मध्ये जॉनी डेपने साकारलेला 'जॅक स्पॅरो' आठवल्यावाचून राहत नाही. असा हा बहुचर्चित चित्रपट, १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा आता ट्रेलरने पाडलेल्या प्रभावानंतर चित्रपटही प्रेक्षकांवर तसाच प्रभाव पाडणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.