मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत अमुक एका कलाकाराच्या शब्दाला बरंच वजन असण्याची उदाहरणं काही कमी नाहीत. अशा कलाकारांमध्ये अग्रस्थानी येणारं एक नाव म्हणजे अभिनेता सलमान खान याचं. सलमानने आजवर अनेक कलाकारांना या कलाविश्वात स्थान मिळवून देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवाय त्याने वाट चुकलेल्यांना मोलाचा सल्ला देत चक्क ताकीदही दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाईजानची ताकीद मिळणारा तो चेहरा आहे,  विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्मा याचा. कपिल शर्मा शोच्या निर्मात्यांपैकी एक असणाऱ्या सलमानने नुकतीच कपिलला ताकीद दिल्याचं वृत्त 'आयबी टाईम्स'ने प्रसिद्ध केलं आहे. आता स्वत:ला कोणत्याही वादाच्या भोवऱ्यात अडकवू नये, असा इशारा त्याने कपिलला दिला. 


गेल्या काही काळापासून कपिल त्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा या कलाविश्वात त्याचा जम बसवत आहे. शिवाय आता कोणत्याही वादाशीही त्याचं नाव जोडलं गेलेलं नाही. या सर्व परिस्थितीसाठी आणि या बदलासाठी सलमानच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. 


सध्याच्या घडीला या कार्यक्रमाचा टीआरपी अगदी चांगला असून, मागे झालेले सर्व वाद पाहता सलमाननेच कपिलला कोणत्याही वादापासून स्वत:ला दूर ठेवण्याची सक्त ताकीद दिली आहे. सहाजीकच त्याच्यासारख्या निर्मात्याला मुकणं कपिलला शक्य होणार नाही, अशी माहिती सोनी टीव्हीच्या सूत्रांनी दिली. 


सुनील ग्रोव्हर कपिलच्या कार्यक्रमात पुनरागमन होणार का?, या प्रश्नावर मात्र सूत्रांकडून नकारात्मक उत्तर मिळालं. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील वादाला कलाविश्वात बरीच हवा मिळाली होती. याच वादामुळे दोन्ही कलाकारांच्या वाटाही वेगळ्या झाल्या होत्या. 


कपिल फक्त या एकाच वादात नव्हे, तर पत्रकाराशी अर्वाच्य भाषेत दुरध्वनीवर संवाद साधल्यामुळेही चर्चेत होता. पण, आपल्याभोवती असणारं हे वादाचं नकारात्मक वलय आणि त्याचा करिअरवर होणारा थेट परिणाम पाहता अखेर त्याने योग्य वाट निवडत पुन्हा एकदा कलाविश्वातील स्थान भक्कम करण्यालाच प्राधान्य दिलं.