जेव्हा सलमान खानने घरात घुसलेल्या चोराला रंगेहाथ पकडलं; पुढे जे केलं ते पाहून कुटुंबीय चक्रावले, आई म्हणाली `तू काय...`
बॉलिवूडचा दबंग सलमान खानची (Salman Khan) जुनी मुलाखत सध्या चर्चेत आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे आपण घरात घुसलेल्या चोराला पकडलं होतं याबद्दल सांगितलं होतं. पण यानंतर त्याने जे केलं होतं, त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.
बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) कधी आपल्या आडमुठा स्वभाव तर कधी मनमोकळेपणाने मदत करण्यामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून मात्र त्याच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबारामुळे तो चर्चेत आहे. एप्रिल महिन्यात त्याच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील घरावर दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर पोलिसांनी तपास करत हल्लेखोरांना अटक केली आहे. यादरम्यान सलमान खान आपल्या एका जुन्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे आपण लहानपणी घऱात घुसलेल्या चोराला पकडलं होतं याबद्दल सांगितलं. विशेष म्हणजे चोराला पकडल्यानंतर त्याने त्याला जेवायला घातलं होतं.
जेव्हा सलमानच्या घऱात घुसला चोर
प्रिती झिंटाचा चॅट शो 'अप क्लोज अँड पर्सनल विथ पीजेड' मध्ये सलमान खानने कशाप्रकारे अनेक लोक कित्येक महिने आफल्या घऱी राहायचे याबद्दल सांगितलं. यामधील काहीजण त्याचे आणि भाऊ अरबाज खानचे मित्र होते. पण यामध्ये अनेकदा काही अज्ञातही असत ज्यांच्याबद्दल कित्येक महिन्यांनी समजत असे. पण तोपर्यंत ते त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झालेले असते. दरम्यान एका रात्री एक चोर सलमान खानच्या घरी आपलं नशीब आजमवण्यासाठी पोहोचला होता.
चॅट शोमध्ये सलमान खानने सांगितलं की, "एकदा आमच्या घरी मोठी पार्टी ठेवण्यात आली होती. पार्टीनंतर अरबाज आणि मी आपल्या बेडरुममध्ये जाऊन झोपलो. अचानक माझे डोळे उघडले. मी एक मोठी सावली पाहिली. तो अजब प्रकारे फिरत होता. मी अरबाजला उठवलं आणि शांत राहण्यास सांगितलं. यानंतर अंधारातून एकजण बाहेर आला. तो वाटत होता तेवढा मोठा नव्हता. त्याला पाहून तो नाचत आहे असं वाटत होतं. मी अरबाजला इशारा केली की, तीनपर्यंत मोजल्यानंतर आपण उडी मारुन त्याला पकडायचं. आम्ही त्याच्यावर नियंत्रण मिळवलं आणि बांधलं".
चोराला जेवायला घातलं
सलमानने पुढे सांगितलं की, आम्ही चोराची चौकशी सुरु केली असता त्याने आपला हा चोरीचा पहिलाच प्रयत्न असल्याचं सांगितलं. तो नाचत होता कारण त्याने एक वॉकमन चोरला होता. जेव्हा सलमानने चोराला तू घरातून काय चोरलं आहेस असं विचारलं तेव्हा त्याने 5 रुपये दाखवले. यानंतर सलमानने त्याला तू जेवलास का विचारलं असता त्याने नाही म्हटलं. यानंतर सलमानने त्याला जेवायला दिलं. पुढे सलमान म्हणाला की, "तितक्यात माझी आई आली. तिने हा कोण आहे असं विचारलं. मी सांगितलं की चोर आहे. त्यावर तिने मग तू त्याला जेवायला का दिलं आहेस? असं विचारलं".
त्यानंतर सलमानने चोराला सांगितलं की, जेवल्यानंतर पोलिसांना बोलवू. तो म्हणाला, 'ही सकाळी 6 ची वेळ होती. आम्ही त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात होतो. त्या चोराने आम्हाला पोलिसांकडे जाऊन इतकं कागदोपत्री काम करावे लागेल, तुम्ही मला बाहेर बांधले तर बरे होईल असं सांगितलं. त्याने आम्हाला दोरीची एक गाठ बांधण्यास सांगितलं आणि जेव्हा पोलिस येत होते तेव्हा तो रशी सोडन पळाला.
सलमानचे म्हणणे ऐकल्यानंतर प्रीती म्हणाली तो आता तुझे चित्रपट पाहत असेल. यावर सलमान म्हणाला, त्याला त्या रात्री आपण कोणाला भेटलो होतो हेदेखील माहिती नसेल.